कोरोनाचा कहर! यावर्षी तब्बल 126 डॉक्टरांचा कोविडमुळे मृत्यू

कोरोनाचा कहर! यावर्षी तब्बल 126 डॉक्टरांचा कोविडमुळे मृत्यू

या वर्षी 126 डॉक्टरांचा कोविडमुळे बळी गेला असून गेल्या वर्षी ही संख्या 734 होती.

  • Share this:

नवी दिल्ली, 6 मे: देशभरात गेल्या मार्चपासून पसरलेल्या कोविड-19च्या (Covid 19 Pandemic) भयानक साथीनं लाखो लोकांचा बळी घेतला असून अद्यापही ही साथ ओसरलेली नाही. सध्या तर या साथीच्या दुसऱ्या लाटेनं अतिशय भयावह स्थिती निर्माण केली आहे. पहिल्या वेळेपेक्षा अधिक झपाट्यानं संसर्ग वाढत असल्यानं देशभरात ऑक्सिजन आणि अत्यावश्यक औषधांचा भीषण तुटवडा निर्माण झाला. यामुळे अनेक रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला. या साथीच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाल्यापासून लोकांचे जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या अनेक डॉक्टरांचाही (Doctors) या रोगानं बळी घेतला आहे. या वर्षी 126 डॉक्टरांचा कोविडमुळे बळी गेला असून गेल्या वर्षी ही संख्या 734 होती, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशननं (Indian Medical Association -IMA) दिली आहे.

दरम्यान, यावर्षी लस (Vaccine) उपलब्ध झाल्यानं देशात पहिल्या टप्प्यात 16 जानेवारीपासून डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी यांचे लसीकरण करण्यात आलं. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांचे आणि आता उर्वरीत नागरिकांचे असे टप्प्याटप्प्यानं लसीकरण सुरू आहे. यावर्षी मृत्यू पावलेल्या डॉक्टरांचे लसीकरण झाले होते का याबाबतची माहिती मिळवण्याचा प्रयत्न इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA)करत आहे.

‘केंद्र सरकारआणि विविध राज्यांच्या आरोग्य विभागानं कोविड-19 झालेल्या आणि त्यामुळं मृत पावलेल्या आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाची स्थिती काय होती यासह माहिती नोंदवून ठेवणं आवश्यक आहे. दुर्दैवाने, सरकार तसे करत नाही म्हणून आयएमएही माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करीत आहे, असं डॉ. रवी वानखेडकर यांनी सांगितलं.

वाचा: महाराष्ट्रावर नवं संकट; कर्नाटकहून येणारा ऑक्सिजन पुरवठा केंद्राने थांबवला

लसीकरण मोहिमेत आतापर्यंत 16 कोटीपेक्षा जास्त लोकांचे लसीकरण झालं असून, 94.7 लाख आरोग्यसेवा कर्मचार्‍यांनी (Health Care Workers-HCW) पहिला डोस घेतला आहे तर 63.5 लाख कर्मचाऱ्यांना दुसरा डोस मिळाला आहे. आयएमएनं एक कोविड शहीद निधी देखील तयार केला असून, ज्यामधून आतापर्यंत मृत डॉक्टरांच्या कुटुंबियांना 1.6 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत, अशी माहितीही संघटनेनं दिली आहे.

सर्वात कमी मृत्यूची आकडेवारी:

बिहारमध्ये कोविडमुळे मरण पावलेल्या डॉक्टरांची संख्या सर्वाधिक असून, तिथं 49 डॉक्टरांचा बळी गेला आहे. बिहारमध्ये सध्या कोविड-१९चा संसर्ग वाढला असला तरी तिथं मृत्यूची आकडेवारी कमी आहे. सर्वांत कमी मृत्यू असणाऱ्या राज्यांमध्ये बिहारचा समावेश आहे. गेल्यावर्षी कोविड-19 चा संसर्ग पसरल्यापासून आतापर्यंत तिथं 2 हजार 926 मृत्यूची नोंद झाली आहे. 12 राज्यांमध्ये 5 हजारांपेक्षा कमी मृत्यू आहेत, तर सहा राज्यांमध्ये मृत्यूची संख्या दहा हजारांपेक्षा अधिक आहे. यामध्ये महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू, उत्तराखंड, कर्नाटक आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे. सर्वाधिक मृत्यू असणाऱ्या महाराष्ट्रात कोविड 19 मुळे 9 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत आठ, तामिळनाडूत सहा, पश्चिम बंगालमध्ये 5 आणि उत्तराखंडमध्ये एक अशी आकडेवारी समोर आली आहे. फेब्रुवारीमध्ये सरकारनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 162 डॉक्टरांचा कोविडनं मृत्यू झाला आहे; पण हा आकडा चुकीचा असून हा आकडा 734 असल्याचं इंडियन मेडिकल असोसिएशननं (आयएमए) म्हटलं आहे.

First published: May 6, 2021, 4:58 PM IST

ताज्या बातम्या