मुंबई, 6 मे: कोरोना (Corona) बाधित रुग्णांची राज्यात वाढ होत असताना वैद्यकीय ऑक्सिजनचा (Medical Oxygen) तुटवडा सुरू झाला. त्यामुळे राज्याने देशभरातील इतर राज्यांतून ऑक्सिजनची मागणी केली आणि त्यानुसार महाराष्ट्राला (Maharashtra) विविध राज्यांकडून ऑक्सिजनचा पुरवठा होण्यास सुरूवात झाली. मात्र, आता केंद्र सरकारने (Central Government) कर्नाटकहून (Karnataka) राज्याला होणारा ऑक्सिजन पुरवठा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्याच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं दिसत आहे. या संदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना म्हटलं, कर्नाटकहून येणारा ऑक्सिजन पुरवठा थांबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे आणि त्यामुळे निश्चितच अडचणी येणार आहेत. राज्याच्या वाट्याचा ऑक्सिजन थांबवणे योग्य नाही. या संदर्भात आम्ही वरिष्ठ स्तरावर बोलत आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसोबत बोलणार आहेत. 1750 मेट्रिक टन ऑक्सिजनची राज्याला दररोज गरज आहे, कर्नाटकने ऑक्सिजनचा पुरवठा थांबवल्यामुळे अडचणी येणार आहेत. कोल्हापूरहून गोव्याला होणारा ऑक्सिजन पुरवठा बंद करावा बेल्लारी, कर्नाटक येथून येणारा ऑक्सिजन पुरवठा कर्नाटकने थांबवला आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्रावर परिणाम होणार आहे मात्र, ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गोव्याला कोल्हापूर येथून होणारा ऑक्सिजन पुरवठा बंद करावा आणि बेल्लारीतून गोव्याला ऑक्सिजन पुरवठा करावा अशी मागणी सतेज पाटील (Satej Patil) यांनी केली आहे. वाचा: आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती, आरोग्य मंत्र्यांची माहिती राज्याचे अन्न आणि औषधमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले की, कोविड रुग्णांवर उपचारासाठी वैद्यकीय ऑक्सिजन हे अत्यंत महत्वाचे आहे. अन्न आणि औषध प्रशासनाद्वारे राज्यातील लिक्विड मेडिकल ऑक्सिजन उत्पादकांना त्यांनी दररोज कोणत्या जिल्ह्यात किती ऑक्सिजन पुरवावा यासाठी पुरवठाबाबतचे विवरणपत्र तयार करुन ते उत्पादकांना देण्यात येते. 6 मे 2021 साठी प्रशासनाने उत्पादकांना 1713 टन ऑक्सिजन पुरवण्यासाठी पुरवठा विवरणपत्र जारी केले आहे. 4 मे रोजी राज्याला गुजरात येथून 116.5 टन, भिलाई छत्तीसगड येथून 60 टन आणि बेल्लारी कर्नाटक येथून 81 टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन राज्यासाठी प्राप्त झाले आहे. ‘महाराष्ट्र - मिशन ऑक्सिजन’ ऑक्सिजनचा निर्मिती, साठवण आणि वितरण या बाबत महाराष्ट्राला स्वावलंबी बनविण्यासाठी “महाराष्ट्र - मिशन ऑक्सिजन” ही मोहीम सुरू कण्यात आली आहे. सध्या महाराष्ट्रत 1800 मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता आहे. यापैकी 1295 मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती महाराष्ट्रात होते. तर सुमारे 500 मेट्रिक टन ऑक्सिजन आपणास इतर राज्य व केंद्र शासनाच्या मदतीन उपलब्ध होत आहे. सद्यस्थितीत असलेल्या 38 PSA प्लांटस मार्गात 53 मेट्रिक टनची निर्मिती होत आहे. तसेच अल्पकाळातील आवश्यकतेचा विचार करता, महाराष्ट्र स्वावलंबी होण्यासाठी राज्यात सुमारे 382 अतिरिक्त PSA प्लांटसची स्थापना करण्यात येत आहे. याच्यामाध्यमातून जवळपास 240 मेट्रिक टनची निर्मिती होणार आहे. विशेष म्हणजे ही सर्व कामे युद्ध पातळीवर सुरू असून सर्व प्लांटस जून अखेरील सक्रिय होणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.