06 एप्रिल : ‘भाजपचा जनतेशी संपर्क नसून ते जनतेशी संवाद साधत नाहीत. त्यामुळे भाजपने अद्याप जाहीरनामा प्रकाशित केलेला नाही. ‘ते’ फक्त मोठमोठी भाषणंच देऊ शकतात’ असा टोला त्यांनी भाजप आणि नरेंद्र मोदींना लगावला आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज हरियाणा येथील सिरसा आणि दिल्लीत झंझावाती प्रचार सभा घेतल्या. हरियाणा येथील सभेत राहुल गांधीनी जाहिरानाम्यावरुन भाजपवर निशाणा साधला.
जातीयवादी राजकारण करुन भाजप देशात फूट निर्माण करत असून भ्रष्टाचाराच्या विषयावरही त्यांची दुटप्पी भूमिका असल्याचे गांधीनी येडीयुरप्पांचे उदाहरण देत स्पष्ट केले. मोदी भ्रष्टाचारावर टीका करत असले तरी कर्नाटकमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या येडीयुरप्पांना भाजपच्या मंचावर बसवले जाते असे त्यांनी सांगितले.
दिल्लीत आम आदमी पक्षाविषयी राहुल गांधी म्हणाले, जनतेच्या मताचा आदर करत आम्ही विरोधी पक्षाला सत्ते स्थापनेसाठी पाठिंबा दिला. खोटे आश्वासन देणे सोपे असते. जी लोक दिल्लीत सत्ता स्थापनेसाठ आली ते सत्तेवरुन पळून गेले. आता काही जण उत्तरप्रदेशमध्ये तर काही जण देशाच्या अन्य भागांमध्ये पळाल्याचा टोलाही त्यांनी आपच्या केजरीवाल व अन्य नेत्यांना लगावला आहे.