ज्या वयात मुलं खोडसाळपणा करतात, शाळेत जायला नकार देतात आणि ज्या वयात मुलांना चांगला-वाईट कळत नाही, त्या वयात फरीदाबादच्या सेक्टर 9 मधल्या एका 11 वर्षाच्या मुलीने पुस्तक लिहायला सुरुवात केली. एक नाही तर 5 विश्वविक्रम तिने नावावर केले आहेत. तेही अवघ्या एका वर्षात. ओळख करून घेऊया 11 वर्षीय वाणी रावलची, जिने पाच विश्वविक्रम आपल्या नावावर केले आहेत.
वाणीने वयाच्या 11 व्या वर्षी कॅथीज 23 डेज ऑफ ख्रिसमस आणि कॅथीज कॉलिंग फाइव्ह एलिमेंट्स ऑफ ख्रिसमस हे पुस्तक लिहिलं आहे. त्यामुळे वाणी रावलला जगातील सर्वात तरुण लेखक होण्याचा मान मिळाला आहे. वाणी रावलने 5 विश्वविक्रम आपल्या नावावर केले आहेत.
वाणी रावल ही फरिदाबादमधील एका सुप्रसिद्ध शाळेची इयत्ता सहावीची विद्यार्थिनी आहे. वाणी रावलचं पुस्तक लेखन 2021 मध्ये कोरोना काळामध्ये सुरू झालं. वाणीने तिचं पहिलं पुस्तक कॅथीज 23 डेज ऑफ ख्रिसमस केवळ एका महिन्यात लिहिलं आणि कॅथीज कॉलिंग 5 एलिमेंट्स ऑफ ख्रिसमस हे दुसरं पुस्तक लिहिण्यासाठी तिला फक्त 11 दिवस लागले.
वाणीच्या या प्रतिभेची विविध जागतिक विक्रमांमध्ये नोंद झाली आहे. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन, वर्ल्ड रेकॉर्ड्स ऑफ एक्सलन्स ब्रोवो इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड्स, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने तिला जगातील सर्वात तरुण लेखिका म्हणून तिला सन्मानित केलं आहे. हे सर्व विश्वविक्रम वाणी रावलने 2022 मध्येच केले आहेत.
विक्रम केल्यानंतर वाणी आणि तिची आई खूप खूश आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना वाणी म्हणाली की, कोणतंही यश मिळवण्यासाठी वयाची अट नसते. भविष्यात आणखी पुस्तकं लिहिण्याचं तिचं स्वप्न आहे. त्याचबरोबर वाणीने सांगितलं की, तिला गाणं, नृत्य आणि बुद्धिबळ खेळण्याची देखील आवड आहे.
वाणी रावलच्या आईने सांगितलं की, तिला आपल्या मुलीचा अभिमान आहे. तिला सुरुवातीपासूनच माहित होतं की, आपली मुलगी काहीतरी मोठे करेल. पण अवघ्या 11 वर्षात आपली मुलगी एवढं मोठं यश मिळवेल, याची मात्र तिला कल्पना नव्हती. वाणीच्या आईने लोकांना आवाहन करून सांगितलंय की, मुलगी आणि मुलगा यात फरक नाही. त्यामुळे असा भेदभाव न करता मुलींनाही मुलाप्रमाणेच दर्जा दिला पाहिजे.