01 जुलै : उत्तराखंडमध्ये बचावकार्य अंतिम टप्प्यात आलं असताना ट्विटरवरून भाजप आणि काँग्रेस नेत्यांमध्ये बेछुट मारामारी सुरू आहे. विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री मनिष तिवारी आणि काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री अजय माकन यांच्यात आज चांगलीच चकमक उडाली. अजूनही पीडितांच्या चिताही थंडावल्या नाहीयेत. पण भाजपने 15,000 लोकांना एका दिवसात वाचवल्याचं श्रेय लाटायचा प्रयत्न केला असा आरोप माकन यांनी केला.
तर सगळं बचावकार्य सैन्याने केलंय. तुमच्या सरकारने काय केलं. काहीच नाही. जे जिवंत आहेत, ते उपाशी आहेत. जे मरण पावले आहेत, ते लुटले जात आहे आणि तुम्ही स्वतःची पाठ थोपटवून घेत आहात असा खोचक टोला सुषमा स्वराज यांनी काँग्रेस नेत्यांना लगावलाय. या अगोदरही गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी उत्तराखंडमध्ये गेले होते. त्यानंतर भाजप नेत्यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींना लक्ष करत राहुल गांधी कुठे आहेत? असा सवाल उपस्थित करत टीकेची बरसात केली होती. एवढंच नाहीतर मागील आठवड्यात उत्तराखंडमध्येच काँग्रेसचे नेते हनुमंता राव आणि तेलगु देसमचे ज्येष्ठ नेते रमेश राठोड या दोघांनी एकमेकांना धक्काबुक्की केली होती.
कोण काय म्हटलं ?
- मनिष तिवारी: विरोधी पक्षनेत्यांना सरकारच्या सीबीआयबद्दलच्या प्रस्तावावर टीका करायला वेळ आहे, पण उत्तराखंडला जायला वेळ नाही. - सुषमा स्वराज: आम्ही उत्तराखंडला गेलो नाही, कारण आमच्या जाण्याने मदतकार्यात अडथळे येतील, असं केंद्रीय गृहमंत्री म्हणाले होते. - अजय माकन: अजूनही पीडितांच्या चिताही थंडावल्या नाहीयेत. पण भाजपने 15,000 लोकांना एका दिवसात वाचवल्याचं श्रेय लाटायचा प्रयत्न केला. - सुषमा स्वराज: सगळं बचावकार्य सैन्याने केलंय. तुमच्या सरकारने काय केलं. काहीच नाही. जे जिवंत आहेत, ते उपाशी आहेत. जे मरण पावले आहेत, ते लुटले जातायत. आणि तुम्ही स्वतःची पाठ थोपटवून घेत आहात.