लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी
नाशिक, 29 सप्टेंबर : गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागांत मुसळधार पाऊस (Heavy rainfall) पडत आहे. मुसळधार पावसामुळे नद्या-नाले ओसंडून वाहत आहेत आणि अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. नाशिक (Nashik)मध्येही मुसळधार पावसामुळे धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. पावसाचं थैमान असतानाच एका तरुणाने थेट पोहण्यासाठी वाहत्या पाण्यात उडी घेतली आणि हा प्रकार त्याच्या अंगलट आल्याचं पहायला मिळालं.
नाशिकमधील रामकुंड परिसरात हा तरुण पोहण्यासाठी उतरला. मात्र, पावसाचा प्रवाह जास्त असल्याने तो वाहून जाण्यास सुरुवात झाली. सुदैवाने त्या परिसरात असलेल्या जीवरक्षकांनी त्याला पाहिले आणि मदतीसाठी उडी घेतली. या तरुणाला 500 मीटर अंतरावर लाईफ गार्ड्सने बचावले आणि सुखरूप बाहेर काढले. ही घटना 28 सप्टेंबर रोजी घडली असून त्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
पोहण्याचे धाडस अंगलट; पुराच्या पाण्यात गेला वाहून pic.twitter.com/CB5fCbDHFv
— News18Lokmat (@News18lokmat) September 29, 2021
नाशकात पावसाचा जोर कायम
नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याचं पहायला मिळत आहे. गंगापूर, दारणा ,नांदूर-मध्यमेश्वर या सर्व धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला आहे. गंगापूर धरणातून प्रती सेकंद तब्बल 15 हजार क्यूसेसपर्यंत पाण्याचा विसर्ग वाढण्यात येणार आहे तर नांदूरमध्यमेश्वर धरणातून प्रती सेकंद 25 हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग. यामुळे नदी काठच्या 220 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिक शहरातील गोदावरी पात्रात पाण्यानं धोक्याची पातळी गाठली आहे. दुतोंडया मारुतीच्या छातीपर्यंत पाणी पोहोचले आहे. पटांगण भाजी मंडई पूर्ण पाण्याखाली गेली आहे. पात्रातील सर्व पुरातन मंदीर, कुंभस्थान पाण्याखाली गेले आहेत. एकूणच परिस्थिती पाहता प्रशासनाने सतर्कतेचे आदेश दिले आहेत.
पावसाने रोखला विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा मार्ग, जवळपास 200 विद्यार्थी CET परीक्षेला मुकले
नाशिकच्या ग्रामीण भागात पावसाचे थैमान
गेल्या तीन दिवसा पासून होत असलेल्या मुसळधार पावसाने नाशिकच्या ग्रामीण भागात अक्षरशः थैमान घातले आहे. सलग होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मनमाड, नांदगाव, येवला, मालेगाव, चांदवड, बागलाण, सटाणा, देवळा भागातील सर्वच नदी-नाले,ओढ्याना पूर आले आहे. नांदगावची शकांबरी, लेंडी, मन्याड, मनमाड शहरातून वाहणारी पांझन, रामगुळणा मालेगावची गिरणा, मोसम यासह इतर नद्यांनी पूर आले असून काहींनी तर रौद्ररूप धारण केल्याचे चित्र आहे. या भागातील अनेक रस्ते, छोटे पूल पाण्याखाली गेल्यामुळे गाव, वाड्या, वस्त्यांचा संपर्क तुटला आहे. शेतात सगडीकडे पाणीच पाणी झाल्यामुळे शेकडो हेक्टरवरील कांदा, कांद्याचे रोप, मका, बाजरी, भुईमूग, कापूस यासह इतर पिकांना मोठा फटका बसला आहे. काही ठिकाणी घरात पाणी शिरल्यामुळे संसार उपयोगी वस्तूचे नुकसान झाले असून गुलाब वादळाच्या रूपाने आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे हजारो नागरिक, शेतकरी संकटात सापडले आहेत.
पावसामुळे नागपूर- तुळजापूर महामार्ग बंद
यवतमाळमधील ईसापूर धरणाचे 12 दरवाजे उघडल्यानंतर पैनगंगा नदीला पूर आला आहे. कयाधु नदीचे पाणी देखील पैनगंगेला मिळाले आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद उपविभागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी विदर्भ मराठवाडा ला जोडणाऱ्या उमरखेड मधील मार्लेगाव पुलावर पाणी पोहोचले आहे. त्यामुळे धोका लक्षात घेता यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांनी मार्लेगाव पुलावरून वाहतूक बंद केली आहे. पुरस्थितीमुळे नागपूर बोरी तूळजापूर हा महामार्ग बंद झाला असून पुलाच्या दोन्ही बाजूस वाहनं थांबविण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nashik, Rain, महाराष्ट्र