नाशिक, 15 ऑक्टोबर: गेल्या जवळपास पावणे दोन वर्षांपासून महाराष्ट्रासह देशात कोरोना विषाणूने थैमान (Corona pandemic) घातलं आहे. सध्या राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात आहे. परंतु अजूनही विविध सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी कायम आहे. असं असताना नाशिक येथील एका रुग्णालयाच्या आवारात मोठ्या दिमाखात गरबा कार्यक्रमाचं (Garba dance event) आयोजन केल्याची घटना समोर आली आहे. या कार्यक्रमात नृत्य करण्यासाठी शेकडो तरुण तरुणींनी हजेरी लावली होती.
यावेळी रुग्णालय प्रशासनाकडून कोरोना नियमांचा फज्जा उडवला होता. त्यामुळे मुंबई नाका पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी हॉस्पिटलचे एच आर, मॅनेजर आणि म्युझिक सिस्टीम ऑपरेटर विरोधात गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. या कार्यक्रम स्थळी पोलिसांनी अचानक येऊन धाड टाकल्याने तरुण-तरुणींची चांगलीच भांबेरी उडाली होती.
हेही वाचा-गुगल पे करायला लावलं अन् अडकली जाळ्यात;पुण्यात उच्चशिक्षित तरुणीवर दोघांकडून रेप
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशकातील अशोका मेडिकोअर हॉस्पिटल आवारात गरबा नृत्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. काल रात्री याठिकाणी मोठ्या आवाजात गाणी लावून गरबा नृत्य सुरू होतं. या कार्यक्रमात जवळपास 100 ते 150 महिला-पुरुष सहभागी झाले होते. आनंदाच्या भरात डान्स करणाऱ्या या महिला पुरुषांचा कोरोना नियमांचा पूर्णपणे विसर पडल्याचं दिसलं.
या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, शेकडो तरुण-तरुणी एकत्र येत गरबा नृत्य करत आहेत. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अशा मोठ्या कार्यक्रमांवर बंदी असून शेकडोजण एकत्र आले होते. त्यामुळे कोरोना नियमांचा भंग केल्याप्रकरणी, मुंबई नाका पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाड टाकली आहे. तसेच अशोका मेडिकोअर हॉस्पिटलचे एच आर, मॅनेजर आणि म्युझिक सिस्टीम ऑपरेटर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.