नागपूर, 09 नोव्हेंबर: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी दिवाळीत अनेक निर्बंध लादण्यात आले होते. पण यंदा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्यानंतर, देशात सर्वत्र मोठ्या उत्साहाने दिवाळी साजरी करण्यात आली आहे. दरम्यान फटाके फोडताना काही अपघात देखील घडून काहींचा मृत्यू देखील झाला आहे. असं असताना काही तरुणांनी आसुरी आनंद मिळवण्यासाठी मुक्या प्राण्यांच्या जीवाशी खेळण्याचा संतापजनक प्रकार केला आहे. नागपुरातील (Nagpur) काही तरुणांनी एका कुत्र्याच्या शेपटीला चक्क फटाके बांधले आहेत. सोशल मीडियावर मनोरंजन करण्यासाठी काही तरुणांनी कुत्र्याच्या शेपटीला फटाके (tied firecrackers to dog’s tail) बांधून त्याचा व्हिडीओ तयार केला आहे. संबंधित व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर काही प्राणी प्रेमींनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे कुत्र्याच्या शेपटीला फटाके बांधणे, संबंधित तरुणांना चांगलंच महागात पडणार आहे. याप्रकरणी पोलिसांनी नागपूर जिल्ह्यातील निमखेडा येथील काही तरुणांवर गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. हेही वाचा- मंजूर कर्ज देण्यास 3वर्षे टाळाटाळ; हवालदिल शेतकऱ्याने बँकेबाहेरच केला भयावह शेवट जीवन बारई असं गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचं नाव असून निमखेडा गावातील रहिवासी आहे. आरोपी तरुणाने स्वत:च्या मनोरंजनासाठी कुत्र्याच्या शेपटीला फटाके बांधले आहेत. या कृत्यात त्याच्या काही मित्रांनीही त्याला साथ दिल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींनी कुत्र्याच्या शेपटीला दोरी आणि चिकट टेपचा वापर करून फटाके बांधले आहेत, तसेच ते फटाके पेटवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. संबंधित सर्व प्रकार आरोपींनी स्वत: आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला आहे.
नागपुरातील काही तरुणांनी कुत्र्याच्या शेपटीला फटाके बांधल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. pic.twitter.com/GlemuiMpPy
— The मराठी Medium (@MarathiMedium) November 9, 2021
संतापजनक घटनेचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर काही प्राणी मित्रांनी यावर आक्षेप घेत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी जीवन बारई नावाच्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केली नाही.