बेड मिळाला नाही म्हणून झाडाखाली घेतला आसरा; पत्नीसमोरचं कोरोना बाधिताने सोडला जीव

बेड मिळाला नाही म्हणून झाडाखाली घेतला आसरा; पत्नीसमोरचं कोरोना बाधिताने सोडला जीव

बेड उपलब्ध नसल्याने अनेक रुग्ण रुग्णालयाबाहेर जीव सोडत असल्याच्या घटना वाढल्या असून यातून आरोग्य यंत्रणेचा ढिसाळ कारभार समोर येत आहे.

  • Share this:

चंद्रपूर, 22 एप्रिल : चंद्रपूर जिल्ह्यात सक्रिय कोरोना बाधित 14 हजाराच्या आसपास पोचले आहेत. त्यातच बेड, डॉक्टर, इंजेक्शन, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची मागणी वाढली आहे. या स्थितीत बेड न मिळाल्याने अत्यवस्थ स्थितीत कडुलिंबाच्या झाडाखाली आसरा घेतलेल्या बाधिताचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

शहरातील मुख्य शासकीय कोविड रुग्णालय परिसरातील या घटनेने आरोग्य यंत्रणेच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांनी यंत्रणेला जागे केल्यावर बाधिताला बेड दिला गेला. मात्र उपचार सुरू करण्याआधीच बाधिताने प्राण सोडले. केवळ उपचारात 12 तास विलंबामुळे भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील बापू कापकर या बाधिताचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील कोरोना उपचाराची असहाय स्थिती उघड झाली आहे. अन्य कुणावर अशी वेळ आणू नका अशी कळकळीची विनंती मयताच्या नातेवाईकांनी सरकारला केली आहे.

हे ही वाचा-पोटावर झोपल्याने खरंच शरीरातील Oxygen पातळी वाढते का? काय सांगतात तज्ज्ञ पाहा

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या सोबतच सुविधांचा सुद्धा अभाव आहे. बेड अभावी मागील चार दिवसापासून रोज मृत्यू होत आहे. अशातच एक हृदयद्रावक घटना आज घडली, भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा गावातून एक वृद्ध जिल्हा शासकीय वैद्यकीय रूग्णालयातील कोविड रुग्णालयमध्ये सकाळी आठ वाजता दाखल झाले. परंतू बेड मिळाला नाही. 12 तास बेडसाठी नातेवाइकांनी रुग्णालयात विनंत्या केल्या, परंतू कोणीही त्यांची हाक ऐकली नाही. त्यानंतर त्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांना संपर्क साधला सामाजिक कार्यकर्त्यांनी बेडसाठी प्रयत्न केले. शेवटी बेड मिळाला परंतू तोपर्यंत बराच उशीर झाला होता. त्या वृद्ध रुग्णाने पत्नी समोर प्राण सोडले. बेडसाठी करावी लागणारी प्रतीक्षा आणि उपचारा आधीच रुग्णाचा मृत्यू अशा घटना वाढत चालल्या आहेत. बेड संदर्भात पालकमंत्र्यांनी मोठ्या घोषणा केल्या प्रत्यक्षात मात्र बेड दिसत नाही आहे. जिल्हा प्रशासन सांगतं प्रयत्न सुरू आहे. परंतू हे प्रयत्न कधीपर्यंत चालणार? तोपर्यंत पुन्हा किती जीव जाणार? आणि याला जबाबदार नेमकं कोण? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत.

Published by: Meenal Gangurde
First published: April 22, 2021, 8:58 PM IST

ताज्या बातम्या