नागपूर, 25 ऑगस्ट: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात मान्सूनसाठी (Monsoon in Maharashtra) पोषक हवामान नसल्यानं राज्यात पावसानं उघडीप घेतली आहे. चालू आठवडा राज्यात सर्वत्र पावसाचं लॉकडाऊन (No Rain Alerts for week) असेल, अशी शक्यता हवामान विभागाकडून (IMD Alerts) वर्तवण्यात आली होती. तर तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळतील असंही हवामान खात्याकडून म्हटलं होतं. त्यानंतर आता पूर्व विदर्भात पावसासाठी (Rain in Vidarbha) पोषक हवामान तयार झालं आहे. पुढील पाच दिवस पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
पुढील पाच दिवस राज्यात नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या पाच जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे आजपासून 29 ऑगस्टपर्यंत पूर्व विदर्भात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळणार आहेत. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी लागण्याचीही शक्यता आहे. दरम्यान विदर्भात ताशी 30 ते 40 किमी प्रतितास वेगानं वारा वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.
हेही वाचा-COVID-19 च्या भयंकर स्थितीवर पाश्चिमात्य माध्यमांनी भारताला धरलं धारेवर, पण..
मराठवाड्यात होणार विजांचा कडकडाट
ऑगस्ट महिन्यात मराठवाड्यात अपेक्षित पावसानं हजेरी लावली नाही. त्यामुळे मराठवाड्यासह आसपासच्या परिसरात राहाणारा शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. मराठवाड्यात बहुतांशी ठिकाणी ढगाळ आणि अंशतः ढगाळ हवामानाची नोंद करण्यात येत आहे. पण याठिकाणी पाऊस मात्र पडत नाही. मागील आठवड्यात काही ठिकाणी तुरळक सरी कोसळल्या आहेत.
हेही वाचा-चिंता वाढली ! कोरोना सुपर व्हेरिएंट कोविड-22 हा कोविड-19पेक्षाही असू शकतो घातक
पण आज मराठवाड्यात सर्वत्र विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मुंबई वेधशाळेनं आज औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, बीड, उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यांना इशारा दिला आहे. त्यामुळे आकाशात विजा चमकत असताना, नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचा मोठ्या झाडाच्या आडोशाला उभं न राहण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. मुंबईसह पुणे आणि घाट परिसरात काही ठिकाणी अंशतः ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. पण याठिकाणी आज पावसाची शक्यता जवळपास नाहीच.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Maharashtra, Nagpur, Weather forecast