नवी दिल्ली, 25 ऑगस्ट : कोरोना विषाणूचा संसर्ग 2019मध्ये सुरू झाला आणि त्याने जगभर हाहाकार माजवला. गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ कोविड-19ने (Covid19) निर्माण केलेली ही गंभीर परिस्थिती कायम आहे. त्यावर आता लसीकरणाचा उपाय शोधण्यात आला आहे. तरीही अद्याप बऱ्याच मोठ्या लोकसंख्येचं लसीकरण होणं बाकी आहे. कोरोनाचे वेगवेगळे व्हॅरिएंट्स सातत्याने तयार होत आहेत. त्यापैकी डेल्टा व्हॅरिएंट खूप घातक असल्याचं दिसून आलं आहे. आता वेगाने लसीकरण पूर्ण करण्याची गरज शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. कारण पुढच्या वर्षीपर्यंत कोविड-22 (Covid22) हा अधिक जास्त वेगाने पसरणारा कोरोनाचा सुपर व्हॅरिएंट (Super Variant of Corona) येण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. लसीकरण न झालेल्या कोणाही व्यक्तीच्या मार्फत या सुपर व्हॅरिएंटचा फैलाव होऊ शकतो, अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.
लसीकरण न झालेल्या कोणीही व्यक्ती या नव्या सुपर व्हॅरिएंटच्या (Super Variant) सुपर स्प्रेडर (Super Spreader) ठरू शकतात. त्यापासून बचाव करण्यासाठी सर्वांनी शक्य तितक्या लवकर लसीकरण (Vaccination) करून घ्यावं. मुलांच्या लसीकरणाला अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे घरातल्या मोठ्यांनी कायम कोविड प्रोटोकॉलचं (Covid Protocol) पालन करणं, तसंच मुलांना कुठेही बाहेर नेताना / जाताना त्याचं पालन करणंही आवश्यक आहे. सॅनिटायझरचा वापर, हात-तोंड स्वच्छ धुणं, सोशल डिस्टन्सिंग, डबल मास्कचा वापर, घराची स्वच्छता आदी गोष्टी पाळणं अत्यावश्यक आहे. बाहेरून आणलेली वस्तू/सामान घरात घेताना डिसइन्फेक्ट करून घेणंही गरजेचं आहे. 'दैनिक जागरण'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
Covishield : कोरोना लशीच्या 2 डोसमधील अंतर कमी होणार; लसीकरणातही मोठा बदल
कायमसाठीच सावधानता बाळगणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. कारण कोरोनाचं रूप सातत्याने बदलत असून, तो केव्हा गंभीर रूप धारण करील, हे सांगता येत नाही.
झुरिकमधले इम्युनॉलॉजिस्ट प्रा. साई रेड्डी यांच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या कोरोनाच्या स्ट्रेन्सच्या मिश्रणातून आगामी काळात अधिक गंभीर महामारी येण्याचा धोका आहे. कोविड-19 चा हाहाकार आतापेक्षाही अधिक गंभीर रूप धारण करू शकतो. कोरोनाचे आणखी नवनवे व्हॅरिएंट्स येणं सहज शक्य आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत आणखी काही वेळा लसीकरण करून घ्यावं लागण्याची शक्यता आहे, असंही त्यांनी सांगितलं. कोरोनाचे बीटा आणि गॅमा व्हॅरिएंट्स काही अंशी अँटीबॉडीजना (Antibodies) चकवू शकतात. डेल्टा व्हॅरिएंट (Delta Variant) मात्र खूपच संसर्गजन्य आहे. त्याचा संसर्ग खूप मोठ्या प्रमाणावर पसरतो. लसीकरण न झालेल्या व्यक्ती तो अधिक प्रमाणावर पसरवू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus