तुषार कोहळे, नागपूर, 04 मे: पोलिसांना देखील अनेकदा काही कारणांमुळे नागरिकांचा संताप सहन करावा लागतो. यावेळी जमाव इतकं रौद्ररुप धारण करतं की त्यापुढे पोलीसही काहीच करू शकत नाहीत. नागपूरमध्ये (Nagpur Stone Pelting on Police Van) देखील अशीच एक संतापजनक घटना घडली आहे. याठिकाणी पोलिसांच्या पथकावर संतप्त जमावाने तुफान दगडफेक केली आहे. जमावाच्या हल्ल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये अगदी तरुण आणि अल्पवयीन मुलं देखील पोलिसांवर हल्ला (Attack on Police Personnel) करताना पाहायला मिळत आहेत. कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर संतप्त झालेल्या नागरिकांनी हल्ला चढवला आहे.
सोमवारी संध्याकाळी ही संतापजनक घटना घडली. नागपूरमधील अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामटेके टोली परिसरात अशाप्रकारे नागरिकांचा संताप पाहायला मिळाला. याठिकाणी पोलीस अवैध दारूविक्रीविरोधात कारवाई करण्यासाठी पोहोचले होते. या संतप्त जमावाने पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली, शिवाय त्यांच्या ताफ्यातील गाड्यांची तोडफोड देखील केली आहे. समोर आलेला व्हिडीओ नागरिकांचा संताप दाखवत आहे.
लॉकडाऊनच्या काळात अवैध दारूविक्रीच्या घटना वाढल्या आहेत. केवळ अत्यावश्यक वस्तू आणि सेवांच्या विक्रीसाठी परवानगी असताना अशाप्रकारे अवैध दारुविक्री करणाऱ्यांवर विविध शहरात कारवाईच्या घटना समोर आल्या आहेत. अशाप्रकारे अवैध दारूविक्री होत असल्याची माहिती मिळताच, कारवाई करण्यासाठी पोलिसांवरच जमावाने हल्ला केल्याने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिसांवर केलेल्या या हल्ल्यामुळे रामटेके टोली परिसरात सोमवारी रात्री उशिरापर्यंत आरोपींची धरपकड सुरू होती. याप्रकरणा नागपूर पोलीस अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.