नागपूर, 09 ऑगस्ट: ऑफिस, बस स्थानक, रेल्वेस्थानक अशा सार्वजनिक ठिकाणी दररोज हजारो महिलांचा विनयभंग केला जातो. पण अशाप्रकारचा विनयभंग महिला निमूटपणे सहन करतात. पण पुरुषी मानसिकतेमधून केलेली छोटीशी कृती देखील विनयभंग (Molestation) असू शकते, हे न्यायालयानं वारंवार सिद्ध केलं आहे. असाच एक निर्णय आता मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) नागपूर खंडपीठानं (Nagpur Bench) सुनावला आहे. विवाहित महिलेच्या अंगावर प्रेमपत्र फेकणं (Throw love letter on married woman) हा देखील गुन्हाच (Crime) असल्याचं नागपूर खंडपीठानं म्हटलं आहे. विनयभंगाच्या एका प्रकरणावर सुनावणी सुरू असताना न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. संबंधित गुन्हा 2011 साली घडला होता, मात्र या घटनेचा सुनावणी नुकतीच नागपूर खंडपीठासमोर करण्यात आली आहे. दोन्ही बाजूंची मतं जाणून घेतल्यानंतर न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. हेही वाचा- POCSO Court: मुलीचा हात पकडणं म्हणजे लैंगिक अत्याचार नाही, न्यायालयानं दिला महत्त्वाचा निर्णय नेमकं प्रकरण काय आहे? अकोला येथील रहिवासी असणाऱ्या एका 45 वर्षीय विवाहित महिलेचा 2011 साली एका 54 वर्षीय व्यक्तीनं विनयभंग केला होता. आरोपी व्यक्तीनं पीडित महिलेला एक प्रेमपत्र दिलं होतं. पण पीडितेनं हे पत्र घेण्यास नकार दिला असता आरोपीनं ते पत्र पीडितेच्या अंगावर फेकत तिला ‘आय लव्ह यू’ म्हणाला होता. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानं पीडित महिलेला धमकी देखील दिली होती. या प्रकरणी पीडित महिलेनं पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पीडित महिला विवाहित असून तिला एक मुलगा देखील आहे. हेही वाचा- ‘अल्पवयीनांना निर्वस्त्र न करता छातीला स्पर्श करणं लैंगिक अत्याचार नाही’, नागपूर खंडपीठाचा निर्णय ही घटना घडल्यानंतर, पीडित महिलेनं अकोला पोलिसांत विनयभंग आणि प्रेमपत्र अंगावर टाकल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यासंदर्भात सुनावणी सुरू असताना नागपूर खंडपीठानं हा महत्त्वाचा निर्णय दिला आहे. विवाहित महिलेच्या अंगावर ‘आय लव्ह यू’ असं लिहिलेलं किंवा प्रेम व्यक्त करणारी कविता, शायरी लिहिलेला कागद फेकणं’ हा विनयभंग असल्याचा निर्णय नागपूर खंडपीठानं दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







