अकोला, 3 जून : सध्या खरीप हंगामाची तयारी व लगबग सुरु आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे वाजवी दरात उपलब्ध व्हावी, यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. तथापि, बोगस बियाणे वा उगवण न होणारे बियाणे शेतकऱ्यांना विक्री झाल्यास संबंधित बियाणे उत्पादक कंपन्यांवर कारवाई करावी, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज दिले. अकोला जिल्ह्यात काही ठिकाणी बियाणे विक्रेते कृषी सेवा केंद्र चालक शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे विक्री करतांना उगवण चाचणी करु याबाबत शिक्का मारुन सही घेऊन विक्री करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याबाबत पालकमंत्री कडू यांनी बि-बियाणे खते उपलब्धता याबाबत आढावा घेतांना वरील निर्देश दिले. यावेळी आमदर नितीन देशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरव कटीयार, मनपा आयुक्त निमा अरोरा, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. के. व्ही. खोत, जिल्हा कृषी विकास अधिकारी तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. अकोला जिल्ह्यात अशापद्धतीने शेतकऱ्यांना बियाणे विक्री होत असेल तर संबंधित उत्पादक कंपनीला जबाबदार धरुन कारवाई केली जाईल, असे स्पष्ट निर्देश कडू यांनी दिले. हे ही वाचा- ओबीसी आरक्षण रद्द : अंबरनाथ-बदलापूरच्या पालिका निवडणुकांची समीकरणं बदलणार यावेळी माहिती देण्यात आली की, शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा घरपोच वा थेट बांधावर पोहोचविण्यासाठी कृषी विभागाने 631 व्हॉटसअॅप ग्रुपच्या माध्यमातून ६६५०० शेतकरी सभासदांपर्यंत व त्यामार्फत सुमारे अडीच लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे. जिल्ह्यात यामाध्यमातून २९० शेतकरी गटांमार्फत आतापर्यंत ९०७० शेतकऱ्यांना थेट बांधावर कृषी निविष्ठा पोहोच झाल्या असून हे काम सुरुच आहे. त्यात आतापर्यंत ३०८० क्विंटल बियाणे व १६२० मेट्रीक टन खते पोहोचविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी खोत यांनी दिली. याकाळात शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा पोहोचविण्याचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कृषी सेवा केंद्र चालक, कृषी सहाय्यक, कृषी सेवक यांचे सत्कार करा, त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरव करा, असेही निर्देश कडू यांनी यावेळी दिले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







