मुंबई, 12 जुलै: दोन हजार रुपयांच्या रिफंड (Refund) करण्याच्या नावाखाली सायबर चोरट्यानं (Cyber thief) चेंबरमधून एका महिलेला सव्वा लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना समोर आली. याप्रकरणी चेंबूर (Chembur) पोलीस ठाण्यात एका अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पीडित महिलेनं दिलेल्या पुराव्याच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत. त्यासाठी सायबर सेलच्या पोलिसांची मदत घेतली जात आहे. फिर्यादी महिला चेंबूर परिसरातील रहिवासी आहे. गेल्यावर्षी 17 नोव्हेंबर रोजी पीडित महिला दिवाळीची शॉपींग करण्यासाठी गेल्या. दरम्यान त्यांनी एका दुकानात दोन हजार रुपयांचं सामान खरेदी केलं. याचं पेमेंट त्यांनी गुगल पे अॅपद्वारे केलं. पण समोरच्या व्यक्तीला पैसे पोहोचलेच नाहीत. शिवाय पीडितेच्या बँक खात्यातून मात्र पैसे वजा झाले. त्यामुळे ते पैसे रिफंड मिळवण्यासाठी पीडितेनं कस्टमर केअरला फोन केला. हेही वाचा- फक्त 120 रुपयांसाठी चोरी, चोरीचं कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का पीडित महिलेनं गुगलवर सर्च करून कस्टमर केअरचा नंबर मिळवला होता. पण संबंधित नंबर कोणत्याही बँकेचा किंवा गुगल पे कंपनीचा नव्हता, तर तो नंबर एका सायबर चोरट्याचा असल्याचं तपासात उघड झालं आहे. अज्ञात सायबर चोरट्यानं पीडित महिलेला रिफंड मिळवून देण्याच्या नावाखाली एनी डेस्क ॲप नावाचं अॅप्लिकेशन डाउनलोड करायला सांगितलं. समोर व्यक्ती बँकेतील कर्मचारी असल्याचं समजून पीडितेनं संबंधित अॅप्लिकेशन आपल्या मोबाइलवर डाऊनलोड केलं. हेही वाचा- स्वतःच्याच दुकानात डल्ला, मग पोलिसांत तक्रार; 17 लाखांच्या चोरीचं फुटलं बिंग ॲप्लिकेशन डाउनलोड झाल्यानंतर पीडित महिलेच्या मोबाइलवर ओटीपी येऊ लागले. यानंतर आरोपीनं पीडितेला फोन करून मोबाइलवर आलेल्या ओटीपीची विचारणा केली. महिलेनंही आरोपीला ओटीपी सांगितला. यानंतर आरोपीनं अवघ्या काही सेकंदात संबंधित महिलेच्या अकाऊंटमधील 1 लाख 34 हजार रुपये लंपास केले. त्यांनी याबाबत फोनवर बोलणाऱ्याकडे विचारणा करताच त्याने उडवाउडवीची उत्तरं देत फोन बंद केला. आपल्या खात्यातून पैसे वजा झाल्याचं कळताच पीडितेनं बँकेत संपर्क साधला. तेव्हा संबंधित फोन नंबर बँकेचा नसल्याचं सांगण्यात आलं. याप्रकरणी पीडित महिलेनं चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.