Home /News /mumbai /

राम मंदिर भूमिपूजनाला जाणार की नाही? उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच दिलं उत्तर

राम मंदिर भूमिपूजनाला जाणार की नाही? उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच दिलं उत्तर

Mumbai: Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray formally takes charge of his office, in Mumbai, Friday, Nov. 29, 2019. (Twitter/PTI Photo) (PTI11_29_2019_000181B)

Mumbai: Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray formally takes charge of his office, in Mumbai, Friday, Nov. 29, 2019. (Twitter/PTI Photo) (PTI11_29_2019_000181B)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्येला जाणार असल्याचं बोललं जात आहे.

    मुंबई, 26 जुलै : अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिराचं भूमिपूजन (Ram Mandir) 5 ऑगस्ट रोजी होणार आहे. मात्र त्यापूर्वी देशभरातील राजकारण ढवळून निघालं आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेलं वक्तव्य चर्चेचा विषय ठरलं. 'काही व्यक्तींना वाटतं राम मंदिर बांधून कोरोना जाईल,' असा उपरोधिक टोला शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजप नेत्यांना लगावला. मात्र त्याचवेळी महाविकास आघाडीचं नेतृत्व करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्येला जाणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्वत:च याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 'राममंदिराचे भूमिपूजन 5 ऑगस्टला होईल अशी तारीख जाहीर झाली आहे. आपण त्या भूमिपूजनाला जाणार का?' असा प्रश्न मुलाखतीदरम्यान खासदार संजय राऊत यांनी विचारला. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, 'नुसतं ‘हो’ किंवा ‘नाही’ असं उत्तर द्यायचं तर मी व्यक्ती म्हणून काही उत्तर देऊ शकेन, पण आपण जसं म्हणालात की, राममंदिराच्या लढय़ात शिवसेनेच्या भूमिकेची इतिहासाने दखल घेतली आहे. मी मुख्यमंत्री नव्हतो त्याही वेळेला राममंदिरात गेलो. किंबहुना योगायोगावर माझी श्रद्धा आहे. माझी भावना हेच सांगते की, नोव्हेंबर 18 मध्ये पहिल्यांदा मी राममंदिरात गेलो होतो, आपण सोबत होतात. शिवनेरीवरची म्हणजे शिवजन्मभूमीची एक मूठ माती मी घेऊन गेलो, त्यानंतर या विषयाला खूप चालना मिळाली. त्याआधी हा विषय थंड पडला होता. कोणी काही विषयच काढत नव्हता. शिवसेनेने सुरुवात केली. उशीर लागत असेल तर कायदा बनवा, वटहुकूम काढा, वाट्टेल ते करा, पण राममंदिर बनवा,' असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. राम मंदिराबद्दल संजय राऊतांचे प्रश्न, उद्धव ठाकरेंची उत्तरे... संजय राऊत : ही आपलीच मागणी होती… उद्धव ठाकरे : ही शिवसेनेची मागणी होती. त्यासाठी आपण अयोध्येला गेलो. तुम्ही योगायोग म्हणा, काही म्हणा, ज्या 18 च्या नोव्हेंबरमध्ये मी तिथे गेलो, त्याच्या पुढच्या नोव्हेंबरमध्ये राममंदिराचा प्रश्न सुटला आणि मी मुख्यमंत्री झालो. ही माझी श्रद्धा आहे. ज्याला कोणाला अंधश्रद्धा म्हणायचं असेल त्याने म्हणावे, पण ही माझी श्रद्धा आहे आणि असणारच. मुद्दा काय येतो की, सध्या सर्वत्र कोरोनाचं थैमान आहे. मी ठीक आहे. मी म्हणेन, मी अयोध्येला जाणारच. मी मुख्यमंत्री आहे, पण मुख्यमंत्री नव्हतो तेव्हाही मला तिथे मानपान… सगळं मिळतं. मिळालं. तेही शिवसेनाप्रमुख आणि त्यांचा मुलगा म्हणून. ती पुण्याई माझ्याकडे आहेच. आता तर मुख्यमंत्री आहे. मला बंदोबस्त मिळेल, मी व्यवस्थित जाईन. मी पूजाअर्चा करून किंवा त्या कार्यक्रमात सहभागी होऊन परत येईन, पण हे मंदिर सर्वसामान्य मंदिर नाहीय. एखाद्या गावात मंदिर बनवायचं झालं तरी गावकरी एकदिलाने एकत्र येतात, त्या गावासाठी ते अयोध्येसारखेच राममंदिर असते. ते अनेक लोक अयोध्येला जाऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी गावातलं ते मंदिर महत्त्वाचं असतं. अनेक सभासमारंभ, लग्नसोहळे त्या देवाच्या साक्षीने होतात गावात. संजय राऊत : अयोध्येतील मंदिर म्हणजे संघर्ष आहे उद्धव ठाकरे : मग हा राममंदिराचा मुद्दा आहे, ज्याला एका लढय़ाची पार्श्वभूमी आहे. विचित्र पार्श्वभूमी आहे. ज्याच्यावर बाबराने आक्रमण करून मशीद बांधली होती, त्या ठिकाणी पुन्हा आपण मंदिर उभं करतोय. केवळ हिंदुस्थानच्या हिंदूंचं नाही तर, जागतिक कुतूहलाचा विषय आहे. आज आपल्याकडे कोरोनाचं संकट असताना सर्व मंदिरांत जाण्या-येण्याला बंदी आहे. मी अयोध्येला जाऊन येईन, पण लाखो रामभक्त जे उपस्थित राहू इच्छित असतील, त्यांचं तुम्ही काय करणार? त्यांना तुम्ही अडवणार की त्यांना येऊ देणार? त्यांच्या कळत नकळत कोरोनाचा प्रसार होऊ देणार का? कारण हा आनंदाचा क्षण आहे. अनेकांना तिथे जाण्याची इच्छा असणार. नाहीतर तुम्ही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ई-भूमिपूजन करू शकता. संजय राऊत : तुम्हाला आठवत असेल की, मुख्यमंत्री म्हणून आपण जेव्हा अयोध्येला गेलात तेव्हा शरयूच्या तीरावर आपल्याला आरती करण्यापासून थांबवलं होतं. कारण कोरोनाचा प्रसार होण्याची भीती होती… उद्धव ठाकरे : हो, आरती करता आली नव्हती. थांबवलं होतं. संजय राऊत : त्या वेळी कोरोनाची सुरुवात होती. उद्धव ठाकरे : बरोबर आहे. त्याच्या आधी गेलो होतो तेव्हा शरयूचा काठ कसा होता… संजय राऊत : हो, त्याचं स्वरूप भव्य असंच होतं. उद्धव ठाकरे : खच्चून गर्दी होती. हालचाल करायला जागा नव्हती. राममंदिर हा भावनेचा प्रश्न आहे. लोक भावनेनं त्या विषयाला जोडले गेले आहेत. त्यांना तुम्ही थांबवणार कसे. माझं येणं-जाणं मी करीन. मी मुख्यमंत्री असल्याने मी जाऊन येईन. अजूनही अधिकृत तारीख आलेली नाही. अधिकृत कार्यक्रम कसा असेल त्याची कल्पना नाहीय. तो कार्यक्रम आल्यानंतर आपण ते ठरवू, पण लाखो लोकांची जी भावना आहे की तिकडे उपस्थित राहावं. त्यांना तुम्ही कसं अडवणार? कारण तिकडे तो शरयूचा काठच महत्त्वाचा आहे. कारण राममंदिराचं आंदोलन चाललं होतं तेव्हा शरयूसुद्धा लाल झाली होती, रामभक्तांच्या रक्ताने. अशा लाखो, करोडो लोकांच्या भावना निगडित आहेत. संजय राऊत : तुम्ही त्या विषयाशी भावनेनं बांधलेले आहात… उद्धव ठाकरे : आहेच. कारण मी दोन ते तीन वेळा अयोध्येत गेलोय. माझा अनुभव सांगतो. मुळात मी अंधश्रद्धाळू नाही हे लक्षात घ्या. माझे आजोबा, माझे वडील यांची स्पष्ट मते होती. आजोबांची मतं मला चांगली माहीत आहेत. आजोबा माझे नास्तिक नव्हते. त्यांची देवावर आणि देवीवर श्रद्धा होतीच. माझे वडील अंधश्रद्धाळू नव्हते. श्रद्धा आणि अंधश्रद्धेत एक पुसटशी लाइन आहे. ती फार महत्त्वाची आहे. त्या भावनेनेच मी सांगतो, आतापर्यंत मी तीन वेळा अयोध्येला गेलो, पण तिथल्या गाभाऱयासमोर उभं राहिल्यानंतर मला जो अनुभव आला तो अद्भुत होता. इतरांना तसा अनुभव आला असेलही, मी नाही म्हणत नाही. त्यामुळे या विषयावर माझ्याशी कोणी वाद घालू नये किंवा शिकवू नये.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Ram mandir ayodhya, Uddhav thackeray

    पुढील बातम्या