मुंबई, 21 जून : संपूर्ण शिवसेनेला सत्तेतून पायउतार होण्याच्या उंबरठ्यावर घेऊन जाणारे शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेटमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता सूचक ट्वीट करून मोठा दिलासा दिला आहे. ‘आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही’ असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी जवळपास 29 आमदारांना घेऊन गुजरात गाठले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. अखेर 12 तासांच्या या नाट्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सूचक ट्वीट केले आहे.
आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत... बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 21, 2022
‘आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही’ असं एकनाथ शिंदे म्हणाले आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडणार नाही, अशी ठाम भूमिका मांडली आहे. त्यामुळे भाजपमध्ये जाण्याची चर्चा फेटाळून लावली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर सर्व शिवसैनिकांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला मुंबई आणि राज्यातील आमदार पोहोचले आहे. या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी अजय चौधरी यांची गटनेते म्हणून निवड केली आहे. शिवडी लालबाग विधानसभा मतदारसंघाचे आमदार ज्येष्ठ शिवसैनिकअजय चौधरी यांची शिवसेना विधिमंडळ गटनेते म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे.