ST कर्मचाऱ्यांना सरसकट कोरोना लस कधी? सरकारविरोधात टाहो, लसीकरण न झाल्यास आंदोलनाचा इशारा

ST कर्मचाऱ्यांना सरसकट कोरोना लस कधी? सरकारविरोधात टाहो, लसीकरण न झाल्यास आंदोलनाचा इशारा

कोरोनाची लस आल्यानंतर सरकारने सर्वप्रथम फ्रंटलाईन वर्कस आणि कोविड योद्ध्यांना सरसकट लस दिली आहे. पण राज्यातला 1 लाख एसटी कामगार मात्र अजूनही कोरोना लशीपासून वंचित आहे.

  • Share this:

पुणे, 16 एप्रिल : कोरोनाची लस आल्यानंतर सरकारने सर्वप्रथम फ्रंटलाईन वर्कस आणि कोविड योद्ध्यांना सरसकट लस दिली आहे. पण राज्यातला 1 लाख एसटी कामगार मात्र अजूनही कोरोना लशीपासून वंचित आहे. यासंबंधीचे वृत्त न्यूज18 लोकमतने दाखवताच एसटी महामंडळाला अखेर जाग आली आहे. महामंडळाने 45 वर्षे वयापुढील कामगारांचे लसीकरण तात्काळ पूर्ण आदेश दिलेत.

पण महाराष्ट्र एसटी कामगार संघटना या अर्धवट आदेशावर समाधानी नाहीत. सरकारने सरसकट सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे, यामागणीवर संघटना ठाम असल्याचं अध्यक्ष संदीप शिंदे यांनी न्यूज18 लोकमतशी बोलताना सांगितलं.

दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार राज्य सरकारने अजून एसटी कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर्स म्हणूनच जाहीर केलं नसल्याने सर्व कर्मचारी वर्गाला सरसकट लस देण्यात तांत्रिक अडचणी आहेत. पण हा मुद्दा देखील महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेनं खोडून काढलाय. गेल्या लॉकडाऊन काळातही आम्ही अत्यावश्यक कर्मचाऱ्यांची ने-आन करण्यासाठी सेवा दिली. तसंच परप्रांतीय मजुरांना थेट सीमेपर्यंत नेऊन सोडलं आताही एसटीची अत्यावश्यक सेवा सुरूच आहे. मग तरीही सरकार आम्हाला फ्रंटलाईन वर्कस कसे मानत नाही, असा खडा सवाल संघटनेनं उपस्थित केला आहे.

हे ही वाचा-राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ, पाहा तुमच्या जिल्ह्यात किती?

कोविडच्या दुसऱ्या लाटेतही एसटी कर्मचाऱ्यांना कोरोना होण्याचा धोका पत्करूनच सेवा द्यावी लागलेत. कारण सरकारने लसीकरणाच्या प्राधान्य क्रमात त्यांचा समावेशच केलेला नाही. म्हणूनच आजवर तब्बल पाच हजारांच्यावर एसटी कर्मचारी कोरोना बाधीत झालेत. तर 143 एसटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 15 दिवसात तब्बल 750 ST कर्मचारी कोरोनाग्रस्त बनलेत. कोविड योद्ध्या एसटी कर्मचाऱ्यांना लस मिळावी, यासाठी मान्यताप्राप्त संघटनेनं मुख्यमंत्र्याना पत्रही लिहिलंय, पण पुढे काहीच होत नाही. म्हणूनच एसटी कर्मचारी संघटनेनं सरसकट कोरोना लसीकरणासाठी आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिला आहे. कोरोना लस मिळाली नसल्याने एसटी कर्मचारी जीव मुठीत धरून काम करत आहेत. कारण कोणता प्रवासी हा बाधित असेल हे सांगता येत नाही. 45 वर्षे वयाच्या एसटी कर्मचाऱ्यांना देखील आजवर पैसे देऊनच लस घ्यावी लागतेय. राज्यात एसटी महामंडळाचे 1 लाख 4 हजार कर्मचारी आहेत. त्यापैकी फक्त 30 टक्के 45 वर्षे वयापुढील आहेत तर 70 टक्के हे 45 वर्षांखालील आहेत. म्हणूनच शासनानं डॉक्टर्स, पोलीस, पालिका कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही सरसकट लस द्यावी, अशी मागणी एसटी कर्मचारी वर्गातून जोर धरू लागली आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: April 16, 2021, 11:13 PM IST

ताज्या बातम्या