मुंबई 31 ऑक्टोबर: राज्यात राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नावांवरून जोरदार चर्चा सुरू आहे. या नावांमध्ये अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar)यांच्या नावाचीही चर्चा होतेय. त्यांना काँग्रेसने उमेदवारी दिल्याचीही चर्चा होती. नंतर शिवसेनेची ऑफर त्यांनी स्वीकारल्याचही बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार (Minister Vijay wadettiwar) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. उर्मिला मातोंडकरांना काँग्रेसने विधान परिषदेसाठी ऑफर दिली होती मात्र त्यांनी ती नाकारली असं त्यांनी सांगितलं. वडेट्टीवार म्हणाले, मातोंडकरांनी काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यामुळे पक्षाने त्यांना विधान परिषदेसाठी विचारणा केली होती. मात्र त्यांनी राज्यसभेसाठी इच्छुक असल्याचं सांगितलं होतं. आता त्यांनी शिवसेनेची ऑफर जर स्वीकारली असेल तर तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे आणि त्यांना ते स्वांतत्र्य आहे असंही ते म्हणाले. महाआघाडीमध्य नाराजी नाराजी नाही. मध्यंतरी निधी वाटपाचे काही प्रश्न होते त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन ते प्रश्न मार्गी लावलेत. जे लोक देव पाण्यात घालून बसले आहेत त्यांची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही असंही त्यांनी सांगितलं. काय आहे चर्चा? राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या 12 जागांसाठी महाविकास आघाडीतील मित्रपक्षांमध्ये मोठी खलबतं झाली. त्यानंतर ही नावे निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. यामध्ये शिवसेनेकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिचं देखील नाव आल्याने चांगलीच चर्चा झाली. आता उर्मिलाने शिवसेनेची ऑफर स्वीकारल्याचं वृत्त समोर आलं आहे.
' उर्मिला मातोंडकरांनी शिवसेनेची ऑफर जर स्वीकारली असेल तर तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे आणि त्यांना ते स्वांतत्र्य आहे. त्यांनी काँग्रेसची ऑफिर नाकारली होती.' pic.twitter.com/xtPQ1MJSNv
— News18Lokmat (@News18lokmat) October 31, 2020
‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: उर्मिला मातोंडकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. त्यानंतर उर्मिला यांनी या प्रस्तावाला होकार दिला आहे,’ अशी माहिती शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ या दैनिकाशी बोलताना दिली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर उर्मिला मातोंडकरने काँग्रेसमध्ये प्रवेश करत ही निवडणूक लढवली. मात्र निवडणुकीच्या मैदानात तिला अपयश आलं. तसंच या निवडणुकीनंतर तिचे पक्षात मतभेद झाले आणि ती काँग्रेसपासून दूर झाली. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिने सुशांतच्या मुद्द्यावर ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केल्यानंतर उर्मिला आक्रमकपणे माध्यमांसमोर आली आणि तिने कंगनाला जोरदार प्रत्युत्तर दिलं. यानंतरच तिची शिवसेनेशी जवळीक वाढल्याचं बोललं जात आहे.