मुंबई, 14 फेब्रुवारी : शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे अल जामिया-तुस-सैफिया म्हणजेच सैफ अकादमीच्या परिसरात आले होते. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी बोहरा मुस्लिम समाजाचे धर्म गुरू सैयदना मुफद्दल सैफुद्दिन यांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील याच अकादमीच्या उद्घाटनाला आले होते, त्यावरून उध्दव ठाकरे यांनी मोदी आणि भाजपवर टीका देखील केली होती. ‘काल-परवा येऊन मोदीची आपली पोळी भाजून गेले. कुठे पोळ्या भाजल्या त्यांनी? कोणाच्या किचनमध्ये? ते फोटो आले ना. जर मी हे केलं असतं तर? शिवसेनेने उद्धव ठाकरेंनी हिंदूत्व सोडलं. मी त्या समाजाविरोधात नाही. बोहरा समाजाचे लोक आमच्यासोबतही आहेत. चांगली लोक आहेत, पण मी जेव्हा त्यांना चांगलं म्हणतो तेव्हा मी हिंदुत्व सोडलेलं असतं. पण मोदीजी देशाचे पंतप्रधान त्यांच्या किचनमध्ये जाऊन पोळ्या भाजतात, तेव्हा त्यांचं मन किती विशाल आहे. त्यांचं मन विशाल आहे, मग माझं काय? हे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. त्यांनी केलं तर सगळं माफ पण आम्ही केलं तर अपराध,’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांच्या या कार्यक्रमावर टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी मुंबईत आले होते, तेव्हा त्यांनी दोन वंदे भारत ट्रेनना हिरवा कंदील दाखवला, याचसोबत ते सैफ अकादमीच्या परिसरात आले होते. पंतप्रधानांनी अल्जामिया-तुस-सैफियाहच्या परिसराचं उद्घाटन केलं होतं. अल्जामिया-तुस-सैफियाह दाऊदी बोहरा समुदायाची प्रमुख शैक्षणिक संस्था आहे. सैयदाना मुफद्दल सैफुद्दीन यांच्या मार्गदर्शनात ही संस्था बोहरा समुदायाच्या शैक्षणिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.