12 एप्रिल : युती ‘कासव’गतीनं पूर्वपदावर येतेय, ती ‘व्हेंटिलेटर’वर नाही, पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले. राष्ट्रीय पुरस्कार विजेते ‘कासव’ आणि ‘व्हेंटिलेटर’ सिनेमांचे कलाकार उद्धव ठाकरेंना भेटायला मातोश्रीवर आले होते. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी पत्रकारांच्या प्रश्नांना मोकळेपणानं उत्तरं दिली. कलाकारांचं कौतुक करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘या कलाकारांचं जगात कौतुक होतंय, त्यांचं कौतुक घरात करणं आवश्यक आहे.’ यावेळी चित्रपट महोत्सवाची घोषणाही त्यांनी केली. या चित्रपटांचा एक महोत्सव एप्रिल महिन्याच्या शेवटी शिवसेना चित्रपट शाखेच्या वतीने मुंबईत आयोजित करण्यात येणारेय. कुलभूषण जाधव यांच्या प्रश्नावर ते म्हणाले, ‘फक्त भावना व्यक्त करून चालणार नाही, पाकिस्तानला इशारे देऊन चालणार नाही, आता थेट कारवाई करुन दाखवावी लागेल.’ जाधव यांना लवकरच परत आणावं, अशी भावना ठाकरेंनी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘शिवसेना रस्त्यावर उतरून विरोध करते तेव्हा लोक आमच्यावर टीका करतात, मात्र अशी काही घटना झाली की लोकांचं देशप्रेम जागं होतं.’
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.