मुंबई, 8 मे : लष्कर रस्त्यावर यायची काहीच गरज नाही. तुम्हीच सैनिक आहात, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांशी संवाद साधताना दिला. लॉकडाऊनविषयी मुख्यमंत्री काही घोषणा करतील का, अशी चर्चा होती.
कोरोनाव्हायरच्या परिस्थितीविषयी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांशी बैठक झाली. त्याविषयी बोलताना ठाकरे म्हणाले, "बैठकीबद्दल मी समाधानी आहे. राजकारण बाजूला ठेवून सगळे आले. उणिवा आणि सूचनांवर चर्चा झाली. बर्याच सूचना आपण अंमलात आणतोय. सर्वपक्षीय एकजूट दिसून आली."
मुंबईत लष्कर आणणार, अशा अफवा काही जण पसरवत आहेत. ते अजिबात होणार नाही, असं उद्धव म्हणाले. "मुंबईत लष्कर येणार ही अफवा. तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय घेणार नाही", अशी ग्वाही त्यांनी दिली. "केंद्र सरकारला विनंती आहे की, पोलिसांना विश्रांती देण्यासाठी काही काळ द्यावा लागेल. केंद्र सरकारकडे त्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ मागावं लागेल. याचा अर्थ लष्कराला पाचारण केलं असा नाही. म्हणून आधी तुम्हाला सांगतो आहे", असं ठाकरे म्हणाले.
औरंगाबादमध्ये झालेल्या मजुरांच्या मृत्युविषयी मुख्यमंत्री म्हणाले, "अफवांना बळी पडू नका. आजच्या घटनेतही अफवेचेच बळी ठरले. भुसावळला हे कामगार रेल्वे ट्रॅकवरून चालत निघाले होते. भुसावळहून ट्रेन सुटेल हे त्यांना कुणी सांगितलं? औरंगाबादहून गाडी निघणार होते. करमाड गावात थकून बसले. डोळा लागला आणि दुर्दैवाचा घाला आला."
रुग्णालयातला गलथानपणा चालणार नाही
रुग्णालयातल्या गैरकारभाराबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, "डॉक्टरवर हल्ले होता कामा नये.कोरोना योद्धे म्हणून काम करणाऱ्या आरोग्य सेवकांबरोबर चांगलंच वागलं पाहिजे. पण त्याच बरोबर हॉस्पिटलमधला गलथानपणा अजिबात सहन केला जाणार नाही. काल या संदर्भातल्या घटना समोर आल्या. महापालिका, सरकार रुग्णालयातल्या स्टाफबोरबर आहे, त्यांना हवी ती मदत द्यायचा प्रयत्न आहे. पण कारवाई करण्याची वेळ आमच्यावर आणू नका. गलथानपणाला क्षमा केली जाणार नाही."
लॉकडाऊन हा स्पीडब्रेकर आहे. त्याने फक्त रुग्णसंख्या वाढण्याचा वेग मंद असेल. पण आपण आपली काळजी घेणं आवश्यक आहे. कोरोनाची चेन तोडणं महत्त्वाचं आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
कोरोनामध्ये काही चमत्कारही दिसत आहेत. काही प्रेग्नंट महिला COVID-19 पॉझिटिव्ह होत्या. त्यांची बाळं मात्र निगेटिव्ह होती. हे असं सुरू आहे. खबरदारी घेणं हे आपल्या हातात आहे, असं त्यांनी सांगितलं.
लॉकडाऊनचं काय करायचं हे तुमच्या हाती
लॉकडाऊनमध्ये जगणं पिंजऱ्यात बसल्यासारखं आहे. आत्ता ते बसण्याची गरज आहे. पण लॉकाडाऊनची शिस्त काही ठिकाणी बिघडलेली दिसते. हे बंध तोडायला बघाल तर ते आणखी आवळत जाईल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.
'हात जोडून विनंती करायची आहे, की निर्बंध पाळा. कारण लॉकडाऊन संपवणं तुमच्या हाती आहे', असं ते म्हणाले. 'कोरोनाच्या संकटाचा अंदाज अजून अनेकांना आलेला नाही. या शिवरायांच्या महाराष्ट्रात लष्कराची गरज येता कामा नये.माझा प्रत्येक नागरिक सैनिक आहे आणि जवान आहे. त्यामुळे आपण सहकार्यातून या संकटावर मात करू, असंही त्यांनी शेवटी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Uddhav thackeray