ई पास असेल तरच करता येणार मुंबई लोकलने प्रवास, जारी करण्यात आले नवे नियम

ई पास असेल तरच करता येणार मुंबई लोकलने प्रवास, जारी करण्यात आले नवे नियम

मुंबई प्रदेशातील सर्व महानगरपालिकांशी संपर्क साधून कर्मचार्‍यांच्या लोकल प्रवासाच्‍या बाबतीत घ्यावयाच्या आवश्यक त्या उपायोजना आणि कार्यपद्धती निश्चित केली आहे.

  • Share this:

मुंबई, 15 जून : मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून अग्रणी असलेल्या रेल्वेची वाहतूक व्यवस्था सुरू व्हावी, म्हणून सर्व महापालिकांसह राज्‍याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी प्रयत्न केले असून अखेर केंद्र सरकारने मुंबईतील उपनगरीय रेल्‍वे अर्थात लोकल सेवा ही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांसाठी उपलब्ध करून देण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार त्याचे योग्‍य नियोजन बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाने केले आहे. बृहन्‍मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज मुंबई प्रदेशातील सर्व महानगरपालिकांशी संपर्क साधून कर्मचार्‍यांच्या लोकल प्रवासाच्‍या बाबतीत घ्यावयाच्या आवश्यक त्या उपायोजना आणि कार्यपद्धती निश्चित केली आहे.

मागील सुमारे अडीच महिन्यांपासून देशभरात कोविड 19 च्‍या पार्श्‍वभूमीवर टाळेबंदी लागू असल्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद आहे. मुंबईची रक्तवाहिनी म्हणून उपनगरीय रेल्वेची ओळख संबंध जगात आहे, ही रक्तवाहिनीही या कालावधीमध्‍ये बंद होती. त्‍यातून येणाऱया अडचणी लक्षात घेता आण‍ि टाळेबंदीमध्‍ये हळूहळू येत असलेली शिथिलता पाहता, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी देखील मुंबईतील उपनगरीय रेल्‍वे सेवा सुरू व्‍हावी, यासाठी प्रयत्न केले होते. विशेषतः आरोग्‍य क्षेत्रासह अत्‍यावश्‍यक सेवांमध्‍ये कार्यरत मनुष्‍यबळाचा प्रवास सोयीचा व्‍हावा, हा यामागील उद्देश होता.

कुणाला मिळणार प्रवेश?

यावेळी जयस्‍वाल यांनी सांग‍ितले की, सर्व महानगरपालिकांनी आपापल्‍या आरोग्‍य क्षेत्रातील कर्मचाऱयांसह अत्‍यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांना उपनगरीय रेल्‍वेने प्रवास करता यावा, यासाठी सुनियोजित पद्धतीने कार्यवाही करावी. मंत्रालय, बृहन्‍मुंबई महानगरपालिकेसह इतर सर्व स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांचे कर्मचारी, पोलीस, बेस्‍ट तसेच खासगी रुग्‍णालयांचे कर्मचारी व कंत्राटी तत्‍वावर कार्यरत आरोग्‍य कर्मचारी यांनाही या प्रवासाची मुभा असेल, अशी माहिती त्‍यांनी दिली.

कसा दिला जाणार प्रवेश?

या प्रवासासाठी क्‍यूआर कोड आधारित ई पास सुविधा उपलब्‍ध करुन दिली जाणार आहे. मुंबई पोलिसांसाठी सध्‍या उपलब्‍ध असलेल्‍या याप्रकारच्‍या प्रणालीवर ती आधारलेली असेल. येत्‍या 3 ते 4 दिवसांमध्‍ये ही प्रणाली उपलब्‍ध होईल. तोपर्यंत संबंधितांचे ओळखपत्र ग्राह्य मानून तूर्त प्रवास करता येईल. ई पास सुविधा उपलब्‍ध झाल्‍यानंतर सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्‍यक ती माहिती भरुन पास तयार करुन घ्‍यावेत. कार्यालयांच्‍या व कामांच्‍या वेळा सुनिश्चित असल्‍याने रेल्‍वेने त्‍यानुसार वेळापत्रक तयार केले असून त्‍याची माहिती कर्मचाऱ्यांना करुन द्यावी.

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कशी घेणार काळजी?

सर्व स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांनी आपापल्‍या हद्दीमध्‍ये स्‍थानकांवर थर्मल स्क्रिनिंगची व्‍यवस्‍था करावी. शक्‍यतोवर त्‍यासाठी थर्मल कॅमेऱयांचा उपयोग करावा. तसेच रेल्‍वे स्‍थानकांच्‍या 150 मीटर परिघात फेरीवाले किंवा वाहनतळ यांना परवानगी दिली जाणार नाही, याची दक्षता संबंधित स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था व पोलीस यांनी आपसात समन्‍वय राखून घ्‍यायची आहे. तसेच नियोजित सर्व स्‍थानकांवर पुरेशा कर्मचाऱयांसह रुग्‍णवाहिका उपलब्‍ध राहतील, याची तरतूद करावी. बेस्‍ट आणि एसटी महामंडळ यांनी वाहतुकीच्‍या दृष्‍ट‍िकोनातून पुरेशा बसेस उपलब्‍ध करुन द्याव्‍यात, अशी सूचनाही जयस्‍वाल यांनी केली.

प्रत्‍येक स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांनी आपापल्‍या कर्मचाऱयांची आवश्‍यक ती आरोग्‍यविषयक काळजी घेण्‍यासंदर्भात सर्वतोपरी प्रयत्‍न करावे, असेही जयस्‍वाल यांनी अखेरीस नमूद केले.

संपादन - अक्षय शितोळे

First published: June 15, 2020, 9:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading