मुंबई 22 डिसेंबर: राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ही अजुनही जास्त आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळालेला आहे. मात्र येणारे काही दिवस हे अतिशय महत्त्वाचे असल्याने धोका टळलेला नाही असा इशारा तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे. मंगळवारी दिवसभरात 4 हजार 122 रुग्णांनी कोरोनावर मात केली त्यामुळ एकूण संख्या 17 लाख 94 हजार 80वर गेली आहे. राज्याचा Recovery Rate हा 94.3वर गेला आहे. दिवसभरात 3 हजार 106 नवे रुग्ण आढळल्याने राज्यातल्या कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 19 लाख 4 हजार 258 एवढी झाली आहे. राज्यात 75 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यू दर हा 2.57वर गेला आहे. राज्यात उपचाराधिन असलेल्या रुग्णांच्या संख्येतही घट झाली असून 58 हजार रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान, ब्रिटनमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाव्हायरसची प्रकरणं वाढू लागली आणि याचं कारण म्हणजे कोरोनाचं नवं रूप असल्याचं सांगितलं जातं आहे. यूकेमध्ये SARS-CoV-2 चा जो नवा स्ट्रेन दिसून आला आहे, तो अधिक संसर्गजन्य आहे. पण कोरोनाव्हायरसमधील हा बदल गंभीर आजार निर्माण करणारा नाही किंवा त्यामुळे मृत्यूचा धोका अधिक आहे असं नाही, हे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाच्या D614G म्युटेशनमध्ये बदल होऊन नवा स्ट्रेन तयार झाला आहे. नव्या बदलामध्ये 23 जेनेटिक बदल दिसून आले आहेत. अपेक्षेपेक्षा हे बदल जास्त असल्याचं तज्ज्ञ म्हणाले. हे वाचा - कोरोनाचा नवा अवतार किती भयंकर? WHO नं दिलं उत्तर म्युटेशन म्हणजे वायरसच्या जेनेटिक सिक्वेन्समधला बदल. सार्स COV - 2 अर्थात कोरोना हा आरएनए वायरस आहे. त्याचे रेणू ज्या क्रमात रचलेले असतात त्या संरचनेत इथे बदल होतो. या नव्या व्हायरसवरच्या स्पाइक प्रोटिनची रचना बदलेली आहे. या स्पाइक प्रोटिनद्वारे व्हायरस मानवी पेशींमध्ये प्रवेश करतो. हा 40 ते 70% जास्त संसर्गजन्य असल्याचे तज्ज्ञांनी सांगितलं आहं. शास्त्रज्ञांना अशीही भिती वाटते आहे, की कोट्यवधी लोकांनी लस घेतल्यानंतर अजूनच प्रभावीपणे रूप बदलण्यासाठी कोरोनाव्हायरस प्रवृत्त होऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.