कोरोनाचा नवा अवतार किती भयंकर? WHO नं दिलं उत्तर

कोरोनाचा नवा अवतार किती भयंकर? WHO नं दिलं उत्तर

ब्रिटनमध्ये (Britain) कोरोनाव्हायरसच्या नव्या रूपाचा (covid 19 new strain) भारतासह संपूर्ण जगानं धसका घेतला आहे.

  • Share this:

लंडन, 22 डिसेंबर : यूकेमध्ये (UK) कोरोनाव्हायरसचं नवं रूप (New Covid-19 Variant) दिसून आलं आणि संपूर्ण जगानं त्याच धसका घेतला आहे. जवळपास 30 देशांनी ब्रिटनमधील हवाई प्रवास रोखला आहे. भारतातही अनेक राज्यांमध्ये कर्फ्यु लावण्यात आला आहे. कोरोनाचा हा नवा अवतार अधिकच घातक आणि संसर्गजन्य असल्याचं सांगितलं जातं आहे. दरम्यान याबाबत आता जागतिक आरोग्य संघटनेनंदेखील (World Health Organization) प्रतिक्रिया दिली आहे.

नवा कोरोनाव्हायरस जास्त संक्रामक किंवा जास्त घातक आहे, याचे काही ठोस पुरावे सापडलेले नाहीत. पण ब्रिटनमध्ये ज्या ठिकाणी हा व्हायरस सापडला आहे तिथं संक्रमण दर जास्त आहे, असं WHO नं सांगितलं आहे. तसंच ब्रिटनमध्ये परिस्थिती नियंत्रणात असल्याचंही डब्ल्यूएचओनं स्पष्ट केलं आहे.

WHO इमर्जन्सी चीफ माइकल रेयान यांनी सांगितलं, महासाथीत अशी वेळ येते जेव्हा संयम राखण्याची गरज असते. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. कित्येक वेळा एकाच देशात वेगवेगळ्या ठिकाणी संक्रमण दरात अंतर असतं. सध्या स्थिती आपल्या नियंत्रणाबाहेर नाही. पण या परिस्थितीवर नीट लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे.

हे वाचा - नव्या Coronavirus मुळे Alert ! पाहा कुठल्या राज्यात नवे नियम

याआधीदेखील ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांनी सांगितलं, की श्रेणी 4 च्या क्षेत्रात राहणाऱ्या लोकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे कारण त्यांना संक्रमणाचा धोका जास्त आहे. याच मार्गानं आपण कोरोनावर नियंत्रण ठेवू शकतो. स्थिती खूप गंभीर आहे आणि एका अनियंत्रित व्हायरसच्या नव्या रूपाला रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. हा एक जीवघेणा आजार आहे आणि आपल्याला त्याला आळा घालण्याची गरज आहे. या नव्या स्वरूपाच्या व्हारसमुळे हे आणखीनच कठीण झालं आहे.

हा नवा अवतार कुठून आला आहे हे सध्या तरी समजणं अवघड आहे. इंग्लंडमध्ये डिसेंबर महिन्यात संसर्गित झालेले बहुतांश रुग्ण याच प्रकारच्या विषाणूनं बाधित झालेले आहेत. विशेष म्हणजे मागील काही काळातच तब्बल बारा वेळा या विषाणूनं आपलं रुप बदललं आहे. या नव्या रुपावर लस किती प्रभावी ठरेल याबाबत शास्त्रज्ञ साशंक आहेत.

हे वाचा - जगाला पुन्हा एकदा लॉकडाउनकडे घेऊन जाणारा करोनाचा नवा अवतार नेमका काय आहे?

ब्रिटन सरकारनं या नव्या अवताराचा प्रसार अधिक वेगानं होत असल्याचं सांगत 16 डिसेंबरपासून पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर केला आहे. भारतासहीत जगातील अनेक देशांनी आता ब्रिटनमधून येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्वप्रकारच्या प्रवासी वाहतूकीवर आधीच  निर्बंध आणले आहेत. यासंदर्भात खबरदारी म्हणून अनेक राज्यांनीही नागरिकांसाठी नवे नियम घालून दिले आहेत.

Published by: Priya Lad
First published: December 22, 2020, 4:18 PM IST

ताज्या बातम्या