बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव महाराज यांचं निधन

बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव महाराज यांचं निधन

डॉ रामराव महाराज यांना श्वसनाचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांच्यावर मागील दीड महिन्यापासून उपचार सुरू होते.

  • Share this:

मुंबई, 31 ऑक्टोबर : वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथील बंजारा बांधवांचे धर्मगुरू संत डॉ रामराव महाराज ( Dr. Ramrao Maharaj ) यांचे वयाच्या 89 व्या निधन झाले.  कोजागिरी पौर्णिमेला रात्री 11 च्या दरम्यान मुंबई येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये (lilavati hospital) दीर्घ आजाराने त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

डॉ रामराव महाराज यांना श्वसनाचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांच्यावर मागील दीड महिन्यापासून उपचार सुरू होते. मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.  डॉ रामराव महाराज यांचे पार्थिव आज रात्रीपर्यंत पोहरादेवी इथं पोहोचणार आहे. त्यानंतर रविवारी दिवसभर भक्तांना अंत्यदर्शन घेता येणार आहे. त्यानंतर अंत्यविधी सोमवारी करण्यात येणार असल्याची माहिती महंत बाबूसिंग महाराज, संजय महाराज यांनी दिली आहे.

बंजारा समाजाचे रामराव बापू  महाराज यांचा जन्म 7 जुलै 1935 ला पोहरादेवी येथे झाला होता. रामराव बापू महाराज यांना पोहरादेवी येथील संत सेवालाल महाराज यांच्या गादीवर परिसरातील 52 गावाच्या नाईक यांनी संत परशराम महाराज शिवलिन झाल्यावर वयाच्या 14 व्या वर्षी 1948 मध्ये बसविले. 12 वर्ष अनुष्ठान आणि 12 वर्ष मौन धारण केल्यावर रामराव महाराज यांनी देश भ्रमण सुरू केले.

गोर बंजारा धर्मपिठाचे पहिले धर्मगुरू, पोहरादेवी तीर्थक्षेत्राचे मठाधिपती परमपूज्य संत परमपूज्य रामराव बापू हे गोर बंजारा समाजाचे एकमेव धर्मगुरू होते.  रामराव बापू हे बाल ब्रह्मचारी होते. त्यांनी आजवर कुठल्याही प्रकारच्या अन्नाचं सेवन केलं नव्हतं. फक्त दूध आणि फळांचे सेवन ते करायचे.

गोर बंजारा समाज, सेवालाल महाराजांचे विचार-कार्य याचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम त्यांनी आजन्म केलं. बंजारा समाजाला नवी दिशा आणि बळ देण्याचं काम रामराव बापू यांनी केलं.  बंजारा समाजामध्ये रामराव बापू यांचा शब्द अंतिम मानला जायचा. बंजारा समाजाचा बरोबरच इतर धर्मीयांमध्येही परमपूज्य रामराव बापू यांचं एक आदराचे स्थान आहे. संत रामराव बापू महाराज यांच्या कार्याची दखल घेत कर्नाटकमधील गुलबर्गा विद्यापिठाने त्यांना डी. लिट पदवी देऊन सन्मानित केले होते. केंद्र सरकारने रामराव बापू यांचा पद्मभूषण पुरस्कारांने गौरव केला होता.

काही महिन्यांपासून बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव महाराज यांची प्रकृती ठीक राहत नसल्यानं त्यांना मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना  कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी  त्यांनी या जगाचा निरोप घेतला. रामराव महाराज यांच्याविषयी बंजारा समाजाची अपार श्रद्धा असून त्यांच्या पार्थिवावर सोमवारी पोहरादेवी येथे अंत्यसंस्कार करण्यात आहेत. मुंबईहून त्यांचं पार्थिव पोहरादेवी येथे नेण्यात आलं असून त्यावेळी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे अध्यक्ष किसनराव राठोड आणि बंजारा समाजातील मान्यवर तसेच अनेक लोक उपस्थित होते.

'रामराव महाराज या थोर संताच्या जाण्याने बंजारा समाजाची मोठी हानी झाली आहे. परमपूज्य रामराव बापू यांची पोहरादेवी येथे भव्य समाधी उभारली जाणार असून ती गोर बंजारा समाजासाठी श्रद्धास्थान आणि प्रेरणास्त्रोत असेल' असं किसनराव राठोड यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, भाजपच्या नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी डॉ.रामराव महाराज यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. 'बंजारा समाजाचे आद्य धर्मगुरू संत रामराव महाराज पोहरादेवीकर, यांच्या दुःखद निधनाने एका महान तपस्वीला आम्ही समस्त भक्तगण मुकलो आहोत. त्यांचे विचार, तळागाळातील लोकांच्या उत्थानासाठी त्यांनी केलेले कार्य सदैव प्रेरणा देत राहतील' अशी भावना व्यक्त करत पंकजा मुंडे यांनी रामराव महाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

Published by: sachin Salve
First published: October 31, 2020, 11:17 AM IST
Tags:

ताज्या बातम्या