शेवटच्या माणसालाही जपलं पाहिजे, वाढदिवशी शरद पवारांनी दिला नेत्यांना कानमंत्र

शेवटच्या माणसालाही जपलं पाहिजे, वाढदिवशी शरद पवारांनी दिला नेत्यांना कानमंत्र

'आज शाहू, फुले, आंबेडकर यांचा केवळ उल्लेख करून चालणार नाही तर मानसिकता तयार करायची गरज आहे. फुले यांनी आधुनिकतेची कास धरली'

  • Share this:

 

मुंबई, 12 डिसेंबर : 'जी विचारधारा घेऊन सामूहिक कष्ट केले त्या सर्वांचा सन्मान इथं केला गेला आहे.  जी विचारधारा स्वीकारली त्या रस्त्यानं जाण्याचा प्रयत्न करणं हे आगामी पिढीला देखील प्रोत्साहन देणे महत्त्वाचे ठरणार आहे, शेवटच्या माणसाच्या जपणुकीसाठी काम करावं' असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सर्व वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांना दिला आहे.

शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसाच्या (Sharad Pawar 80th Birthday)निमित्ताने मुंबईतील यशवंत चव्हाण सेंटरमध्ये '8 दशके कृतज्ञतेची' या कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या परिस्थितीमुळे मोजक्याच नेत्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शरद पवार यांनी सर्व नेते, मंत्री, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

'जी विचारधारा घेऊन सामूहिक कष्ट केले त्या सर्वांचा सन्मान इथं केला गेला आहे.  जी विचारधारा स्वीकारली त्या रस्त्यानं जाण्याचा प्रयत्न करणं हे आगामी पिढीला देखील प्रोत्साहन देणे महत्त्वाचे ठरणार आहे.  50-55 वर्ष सर्वांच्या समवेत काम करण्याची संधी जनतेनं दिली. त्या काळातील गांधी-नेहरूंचे विचारांचा प्रभाव होता. त्यानुसार कामं केली. कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे ही आईची शिकवण होती, तिचा दृष्टीकोन महत्त्वाचा होता', असं शरद पवार म्हणाले.

तसंच, आज  शाहू, फुले, आंबेडकर यांचा केवळ उल्लेख करून चालणार नाही तर मानसिकता तयार करायची गरज आहे. फुले यांनी आधुनिकतेची कास धरली, फुल्यांना महात्मा मानतो कारण त्यांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला भक्कम घटना दिली. आंबेडकर यांनी विज्ञानाचा आधार घेतला. आधुनिकता आणि विज्ञानाच्या दिशेने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गेलं पाहिजे. नवी पिढी काम करत आहे, यामार्फत देश आणि राज्य उभं राहतं, याची संधी तुमच्यामुळे मिळाली आहे, असंही यावेळी पवार म्हणाले.

दरम्यान, आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देत असताना राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif) यांना अश्रू अनावर झाल्याचा भावूक क्षण पाहण्यास मिळाला.

यावेळी कोल्हापूरमधून हसन मुश्रीफ यांनी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या. 'शरद पवार यांनी सातत्याने समाजाला न्याय देण्याचे काम केले आहे. माझ्या सारख्या अल्पसंख्याक आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांनी सातत्याने पाठिंबा दिला. 2009 साली मिरजमध्ये जातीय दंगल झाली होती. त्यावेळी या दंगलीचा परिणाम हा पश्चिम महाराष्ट्रावर झाला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे बरेच नेते हे पराभूत झाले होते. पण मी मात्र प्रचंड मतांनी विजयी झालो होतो. त्यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता आली होती. त्यानंतर शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली होती की, आज मला सगळ्यात जास्त आनंद झाला आहे, कारण सत्ता जरी आली असली तरी माझा हसन मुश्रीफ नावाचा अल्पसंख्याक कार्यकर्ता निवडून आला, यापेक्षा दुसरा आनंद नाही' असं म्हणताच हसन मुश्रीफ यांना व्यासपीठावर अश्रू अनावर झाले.

Published by: sachin Salve
First published: December 12, 2020, 4:05 PM IST

ताज्या बातम्या