मुंबई, 23 मे: अरबी समुद्रात (Arab Sea) आलेल्या तौक्ते चक्रीवादळा (Cyclone Tauktae)नं केरळपासून गुजरात पर्यंत कहर माजवला. या चक्रीवादळामुळे बरंच नुकसान देखील झालं. अनेकांचे मृत्यू सुद्धा झाले. या चक्रीवादळाच्या तडख्यात समुद्रात काम करणारं 'पापा 305' ही बार्ज मिळालं. यात 261 कर्मचारी तेथे कार्यरत होते. त्यातल्या काही कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर काहींना वाचवण्यात यश आलं. त्यापैकी असाच मॅकेनिकल इंजिनिअर जो या दुर्घटनेत वाचला आहे. मृत्यूच्या दारापर्यत पोहोचलेले अनिल वायचाल हे महाराष्ट्रातले आहे. पी 305 (Barge P305) या बार्जवर अनिल देखील कार्यरत होते.
ज्यावेळी समुद्रात बार्ज बुडत होती. तेव्हा त्यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांसोबत अनिलही समुद्रात उडी घेतली. तब्बल 9 तासांनंतर भारतीय नौदलानं त्यांना वाचवलं. अनिल वायचाल यांनी न्यूज18 ला आपल्या 9 तासांच्या थरारक अनुभवाबद्दल सांगितलं आहे.
40 वर्षांचे अनिल वायचाल (Anil waychal) एफकॉन्स कंपनीत काम करतात. ही कंपनी ONGC साठी कॉन्ट्रॅक्टवर समुद्रात काम करते. अनिल यांनी न्यूज18शी बोलताना सांगितलं की, माझी आणि माझ्या कुटुंबियांशी भेट होईल की नाही याची आशाच सोडून दिली होती. पाण्यातले ते 9 तास हे संपूर्ण आयुष्या इतकेच होते.
पुढे ते सांगतात की, त्या कठिण परिस्थितीतही मी जिवंत राहू शकतो असं मला मनातून सारखं वाटतं होतं. माझे सहकारी खचून गेले होते. त्यांना देखील मी प्रेरित करत होतो. मी त्यांना वारंवार सांगत होतो की आपल्याला जिवंत राहून घरी पुन्हा जायचं आहे. त्यावेळी माझ्यामध्ये अशी कोणती शक्ती आली मला माहित नाही. मनात एक वेगळीच भावना होती. मी एक अत्यंत संवेदनशील व्यक्ती आहे, असं त्यांनी सांगितलं.
'9 तासांचा थरारक अनुभव'
17 मे रोजी ज्यावेळी चक्रीवादळ बार्जला धडकलं त्यावेळी वायचाल आणि त्यांचे सहकारी बार्जवरचं होते. रात्री 2 च्या सुमारास तौक्ते चक्रीवादळ बार्जला धडकलं. तेव्हा वायचाल यांना आपल्या सहकाऱ्यांसोबत समुद्रात उडी घेण्याशिवाय कोणताच दुसरा पर्याय नव्हता. अनिल वायचाल यांनी संध्याकाळी पाचच्या सुमारास समुद्रात उडी मारली. त्यानंतर INS कोचीच्या टीमनं 17-18 मे रोजीच्या दरम्यान रात्री 2 वाजता त्यांची सुटका केली.
मी माझ्या सहकाऱ्यांना एका गटानं समुद्रात उडी मारण्यास सांगितलं होतं. मला त्यावेळी असं वाटलं की, एकत्रित गटानं पाण्यात उडी मारली तर वाचण्याची शक्यता जास्त असेल. रात्री अंधारात चमकणारं लाइफ जॅकेट सर्व कर्मचाऱ्यांनी घातलं होतं. चमकणारं जॅकेट घालून समुद्रात एकत्रित राहिल्यानं नौदलास आम्ही दिसण्यास सोयीस्कर होऊ शकलं असतं. मात्र खराब वातावरणामुळे एकत्रित राहणं शक्य नव्हतं, असं वायचाल यांनी सांगितलं.
वायचाल पुढे सांगतात, आम्ही दोन ते तीन लोकांचा गट बनवला आणि समुद्रात एकमेकांचा हात पकडून राहिलो. मात्र त्यावेळी आम्ही आमच्या सहकाऱ्यांना बघू शकत नव्हतो. जर पाण्यात एखादा सहकारी दिसला की तो क्षणार्क्षात गायब व्हायचा. त्यावेळी वातावरण अतिशय वाईट होतं.
'शेवटी मी एकटाच होतो'
त्यावेळी समुद्राच्या लाटा जवळपास 8 मीटर इतक्या उंच होत्या. लाट येताच आम्ही वेगवेगळे होऊन जायचो. त्यानंतर आम्ही एकत्र यायचो. या 9 तासात मी जवळपास 3 - 4 गटासोबत एकत्र राहिलो. मात्र काही वेळानंतर अशी वेळ आली की मी एकटाच होतो.
हेही वाचा- 1 जूननंतर कसा असेल राज्यातला लॉकडाऊन? आरोग्यमंत्र्यांनी दिले 'हे' उत्तर
जसजसा अंधार पडू लागला त्यानंतर कोणाला काहीच दिसत नव्हतं. त्यावेळी फक्त लाइफ जॅकेटचा चमकणारा प्रकाश आणि रेस्क्यू जहाजांवरील लाइट दिसत होती. अशातच जो कोणी श्वास घेत होता, त्यांना फक्त आपण वाचू हीच अपेक्षा होती, असं अनिल वायचाल यांनी सांगितलं.
'शरीर कमजोर झालं होतं'
जशी उंच लाट यायची, पाणी आमच्या नाकातोंडात जायचं. त्यानंतर काही वेळ आम्हाला काहीच दिसायचं नाही. जेव्हा रेस्क्यू करण्यासाठी येतील त्यावेळी त्या जहाजांवर आम्ही चढू की नाही याची आम्हाला खात्री नव्हती. कारण बराच वेळ समुद्राच्या पाण्यात राहिल्यानं शरीर कमजोर पडत चाललं होतं, असं ते म्हणाले.
जेव्हा रेस्क्यू करण्यासाठी बचाव जहाज आल्या त्यावेळी वायचाल यांनी आपल्या सहकाऱ्यांना त्यांच्याजवळ येण्यास सांगितलं. मात्र काही सहकारी त्यावर चढू शकले नाही आणि अंधार असल्यानं ते पाण्यात बुडाले. त्यातील बहुतेक अजूनही बेपत्ता आहेत.
अनिल वायचाल यांनी सांगितलं की, मी सुद्धा त्या जहाजावर तीन वेळा चढण्याचा प्रयत्न केला. पहिले दोन प्रयत्न अयशस्वी ठरले. त्यानंतर त्यांनी फेकलेल्या जाळ्यात पडलो आणि बचावकर्त्यांना मला वर खेचण्यास सांगितलं.
हेही वाचा- दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात मोठी बातमी
या थरारक अनुभवानंतर अखेर अनिल वायचाल आपली पत्नी आणि दोन मुलांकडे सुखरुप पोहोचले. वायचाल यांनी देवाचे आभार मानले आहेत.
वायचाल यांनी सांगितल्यानुसार, त्यांचे 13 सहकारी होते. त्यापैकी काहींचा मृत्यू झाला तर काही जण अजूनही बेपत्ता आहेत. पी305 बार्ज बुडल्यानंतर 51 लोकांचे मृतदेह सापडले असून अजूनही 24 जण बेपत्ता आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.