मुंबई, 15 एप्रिल : महाराष्ट्रामध्ये कोरोना (Coronavirus) रुग्णांची संख्या प्रचंड वाढत असल्याने राज्य सरकारने बुधवारी रात्रीपासून नवीन नियमावली जाहीर केली आहे. 'ब्रेक द चेन' असं म्हणत लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सूचना दिल्या. या निर्बंधांनुसार केवळ अत्यावश्यक सेवा (Essential Services) सुरू राहणार असून इतर सर्व हालचालींवर मर्यादा आणण्यात आल्या आहेत. अशातच आता शासनाकडून अत्यावश्यक सेवेमध्ये आणखी दोन विभागांचा समावेश केला आहे.
शासनाने नवा आदेश जारी करत वनविभागातील वेगवेगळी कामे आणि विमान वाहतूक संबंधित कामांना प्रवासासाठी आणि कामासाठी सवलत देत त्यांचा अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश केला आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह विभागाशी निगडित इतर व्यवसाय यांना मुभा असणार आहे. तसंच विमान सेवेच्या अंतर्गत येणारे विमानतळ देखभाल, कुरियर, केटरिंग, सुरक्षा या सुविधा देणाऱ्या लोकांना सुद्धा अत्यावश्यक सेवेखाली प्रवास करण्यास मुभा दिली जाणार आहे.
हेही वाचा - एका दिवसात जवळपास दोन लाख जणांना लागण, देशातील कोरोना स्थिती विदारक!
यापूर्वी या दोन विभागांना अत्यावश्यक सेवेत समावेश न केल्यामुळे काही अडचणी तयार झाल्या होत्या. यामुळे राज्य सरकारच्या वतीने आपत्कालीन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी यासंदर्भात नवीन नियमावली जाहीर केली आहे.
दरम्यान, 'जीवनावश्यक आणि आवश्यक सेवा सुविधा बंद केलेल्या नाहीत मात्र याचा अर्थ तिथे नियम मोडले जात आहेत, किंवा गर्दी होत आहे असे दृश्य दिसता कामा नये. अन्यथा त्या सुविधा स्थानिक प्रशासनाने बंद कराव्यात,' अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी याआधीच दिल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Lockdown