मुंबई, 21 जून : खंडग्रास आणि कंकणाकृती अशा दोन अवस्थांमध्ये सूर्यग्रहणाला सुरुवात झाली आहे. मुंबईसह देशातील इतर भागात सूर्यग्रहणाला प्रारंभ झाला आहे. कंकणाकृती ग्रहण सुरू असताना भारतात सूर्याचा 98.6 % भाग चंद्रामुळे झाकला जाणार आहे. डेहराडून, कुरुक्षेत्र, चामोली, जोशीमठ, सिरसा, सुरतगड अशा काही ठिकाणी कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. तर मुंबई, दिल्लीत खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल. ग्रहणादरम्यान दिल्लीमध्ये सूर्याचा सुमारे 94% भाग, गुवाहाटीमध्ये 80 %, पाटणा येथे 78%, सिलचर येथे 75%, कोलकाता येथे 66%, मुंबईमध्ये 62 टक्के, बंगळुरूमध्ये 37% , चेन्नई मध्ये 34 टक्के तर पोर्ट ब्लेअर येथे 28% भाग चंद्रामुळे झाकला जाणार आहे. सुर्यग्रहण कालावधी 1) रविवार, 21 जून रोजी सकाळी 10 वाजून 21 मिनिटांनी सूर्यग्रहणास प्रारंभ होईल. 2) दुपारी 12 वाजून 1 मिनिटांपासून 12 वाजून 2 मिनिटांपर्यंत या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था दिसेल. 3) दुपारी 1 वाजून 48 मिनिटांनी सूर्यग्रहण पूर्णपणे सुटेल. 4) मुंबईतून रविवार दि. 21 जून रोजी सकाळी 10 वाजून 01 मिनिटांनी खंडग्रास सूर्यग्रहणास प्रारंभ होईल. 5) सकाळी 11 वाजून 38 मिनिटांनी ग्रहणमध्य असल्याने सूर्यबिंब जास्तीतजास्त सुमारे 70 टक्के ग्रासित दिसेल. 6) दुपारी 1 वाजून 28 मिनिटांनी सूर्यग्रहण पूर्णपणे सुटेल. महाराष्ट्रातील प्रमुख शहरात किती वाजता खंडग्रास दिसेल? - पुणे येथून सकाळी 10-03 ते दुपारी 1.31 पर्यंत. - नाशिक येथून सकाळी 10.04 ते दुपारी 1.33 पर्यंत - नागपूर येथून सकाळी 10.18 ते दुपारी 1.51 पर्यंत - औरंगाबाद येथून सकाळी 10.07 ते दुपारी 1.37 पर्यंत यावेळेत हे सूर्यग्रहण दिसेल. सूर्यग्रहण म्हणजे काय? सूर्यग्रहण अमावस्येच्या दिवशी दिसते, जेव्हा चंद्र, पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो आणि तिघेही एका सरळ रेषेत असतात. जेव्हा चंद्र पृथ्वीपासून त्याच्या सर्वाधिक लांब अंतरावर राहून सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये येऊन सूर्याला झाकतो, मात्र लहान आकारामुळे तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही, तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण दिसते. अशा वेळी चंद्र सूर्याच्या मध्यभागी दिसतो आणि सूर्याच्या बाह्याकाराचे कंकण दिसू लागते. एका वर्षात संपूर्ण पृथ्वीवरून किमान दोन ते पाचवेळा सूर्यग्रहणं पाहता येतात. त्यातलं एखाद-दुसरंच खग्रास ग्रहण असतं, तेदेखील सगळ्याच देशांतून दिसत नाही. कंकणाकृती ग्रहण दिसणं त्यापेक्षाही दुर्मिळ. चंद्राच्या थेट छायेखाली असलेल्या प्रदेशातच कंकणाकृती ग्रहण दिसतं. तर त्याच्या आसपासच्या प्रदेशात खंडग्रास ग्रहण पाहायला मिळतं. सूर्यग्रहणाचा कसा होणार 12 राशींवर परिणाम? मेष- सूर्य आपल्या कुंडलीमध्ये तिसऱ्या स्थानी असल्यानं आपल्याला हा काळ खूप फलदायी ठरणार आहे. आर्थिक दृष्टीनं शुभ असेल. आपल्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल होतील. वृषभ- या काळात सर्वात जास्त खर्च वाढल्यानं आपल्याला नियंत्रण ठेवावं लागेल. अनेक समस्यांचा सामना करावा लागेल. आपलं आर्थिक नुकसान होऊ शकतं. मिथुन- आरोग्याची सर्वाधिक काळजी घेणं गरजेचं आहे. सकारात्मक विचार करा. तणावाला दूर ठेवा. कर्क- आर्थिक नुकसान होऊ शकतं. याशिवाय आरोग्याच्या बाबतीत बेजबाबदारपणे वागल्यास बिडघू शकतं. प्रतिकारशक्ती कमी झाल्यानं सावधगिरी बाळगा. सिंह-सूर्य आपल्या राशीच्या राशीचा स्वामी असल्याने आपल्याला या ग्रहण काळात मिश्रित फळ मिळतील. जिथे तुम्हाला आर्थिक जीवनात फायदा मिळेल, ज्यामुळे तुमची प्रगती होईल, तर आरोग्याच्या आयुष्यात काही समस्या उद्भवू शकतात. कन्या- सूर्य आपल्या राशीत दहाव्या घरात असेल त्यामुळे तुम्हाला आज अनुकूल फळ मिळेल. विशेषत: हा वेळ शेतासाठी शुभ असेल कारण तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळेल. सुरुवातीपासूनच आपल्या आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगा. तुळ- सूर्य आपल्या राशीतील नवव्या घरात असेल. तुमचा मानसिक ताण वाढेल. विवाहित जीवनातही, मुलांच्या बाबतीत समस्या उद्भवू शकते. वृश्चिक- आपल्या शत्रूंपासून सावध राहा. संपत्तीचा फायदा होईल. धनु-आरोग्याशी संबंधित काही समस्या येऊ शकतात. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. मकर- या ग्रहणाचा आपल्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. मानसिक चिंता जाणवेल. आरोग्य जपायला हवे. कुंभ- खर्चात वाढ होईल. या ग्रहणाचा आपल्यावर प्रतिकूल परिणाम होणार आहे. मीन- तुमचा आत्मविश्वास आणि धैर्य वाढेल, तसेच तुम्हाला फायदा होईल. या अग्रहणाचा तुमच्यावर अनुकूल परिणाम होईल. संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.