मुंबईत कोरोनावरील औषधांचा काळाबाजार, 5 हजार रुपयांच्या इंजेक्शनची 40 हजारांना विक्री

मुंबईत कोरोनावरील औषधांचा काळाबाजार, 5 हजार रुपयांच्या इंजेक्शनची 40 हजारांना विक्री

काळाबाजार करणाऱ्या विक्रेत्यांच्या 7 जणांच्या टोळीला अन्न आणि औषध पुरवठा विभागानं छापा टाकून अटक केली आहे.

  • Share this:

मुंबई, 19 जुलै : राज्यासह देशात कोरोनाने थैमान घातलं असताना मुंबईतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी लागणाऱ्या औषधींचा आणि इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याचा प्रकार उघड झाला आहे. असा काळाबाजार करणाऱ्या विक्रेत्यांच्या 7 जणांच्या टोळीला अन्न आणि औषध पुरवठा विभागानं छापा टाकून अटक केली आहे.

हे विक्रेते वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करतात. ही टोळी कोरोनावर असलेले उपचार करण्यासाठी रेमडेसीविर इंजेक्शन 30 ते 40 हजार रुपयांत विकत होते. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या कोरोना रुग्णांवर परिणामकारक असलेले रेमडेसीविर इंजेक्शन ज्याची किंमत 5 हजार रुपये आहे, ते इंजेक्शन तीस ते चाळीस हजार रुपयात विकत असल्याची माहिती अन्न व औषध पुरवठा विभागाला मिळाली.

यावर या विभागाने मुलुंडमध्ये आपला खबरी पाठवून त्याची शहानिशा केली. खात्री झाली असता त्याला ताब्यात घेतलं. त्याची चौकशी केली असता त्यातून दोन नाव समोर आली. त्यानंतर एफ डी ए ने मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा 7 ला कळवून मदत घेतली असता एकूण 7 जणांना अटक केली.

ही टोळी त्या औषध कंपनीतून ते परस्पर रेमडेसीविर विकत असल्याची माहिती मिळाली असून यात अजून मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त सुनील भारद्वाज यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - Breaking : ठाण्यात लॉकडाऊन वाढवला; पण हॉटस्पॉटकरिताच असतील कडक नियम

दरम्यान, कोरोनारुग्णांच्या संख्येने राज्यात 3 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. एकट्या मुंबईतच 1 लाखांवर रुग्ण आतापर्यंत सापडले आहेत. कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस खाली येत असला, तरी या रोगाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे धोका कायम आहे.

राज्यात काल (शनिवारी) तब्बल 8348 नव्या रुग्णांची भर पडली. तर 144 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 3,00,937वर गेली आहे. तर एकूण मृत्यू 11596 एवढे झाले आहेत. तर मुंबईत शनिवारी 1186 नवे रुग्ण आढळले तर 65 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतल्या रुग्णांची संख्या 1,00,350 एवढी झाली. तर आत्तापर्यंत 5650 जणांचा मृत्यू झाला.

Published by: Akshay Shitole
First published: July 19, 2020, 8:29 AM IST

ताज्या बातम्या