मुंबई, 20 जून : ठाकरे गटाकडून 1 जुलैला मुंबई महापालिकेवर मोर्चा काढला जाणार आहे. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात या मोर्चाचं आयोजन केलं जाणार आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन हा मोर्चा का काढण्यात येणार आहे, याचं कारण सांगितलं. पावसाप्रमाणे निवडणुका लांबत चालल्या आहेत. सरकारला जाब विचारणारं कोणीच नाही. मुंबईत विकास कामाच्या नावानं उधळपट्टी सुरू आहे. शिंदे सरकार बीएमसीमधील ठेवींची उधळपट्टी करत आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. या मोर्चाच्या माध्यमातून मुंबईतल्या भ्रष्टाचाराचा जाब विचार जाईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीसांचा पलटवार दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या या आरोपांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘मुंबई महापालिकेत साडेबारा हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला, तो कॅग रिपोर्टमुळे उघडकीस आलं. या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन केली आहे. या एसआयटीमुळे काही लोकांचे बुरखे फाटणार आहेत, तर काही लोक नागडे होणार आहेत,’ अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. ‘मध्यंतरी दोन-अडीच वर्षांमध्ये महापालिकेत जी गँग उद्धवजींच्या आशिर्वादाने काम करत होती, तिचे बुरखे फाटणार आहेत. हे उद्धवजींच्या लक्षात आल्यानंतर ते बावचळल्यासारखे बोलत आहेत. हा मोर्चा काढणं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा, याशिवाय जास्त काही म्हणता येणार नाही,’ असा निशाणाही देवेंद्र फडणवीस यांनी साधला आहे. बीएमसीमध्ये 12 हजार कोटींची अनियमितता, कॅगच्या ताशेऱ्यांनंतर एसआयटी स्थापन मुख्यमंत्र्यांचंही प्रत्युत्तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरेंच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. दरोडा टाकणाऱ्यांच्या तोंडी चोरीची भाष शोभत नाही. मुंबईकरांचा पैसा मुंबईच्याच तिजोरीमध्ये आहे, त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.