‘जय श्रीराम’च्या नाऱ्यावर चिडू नये, सेनेचा ममतादीदींना सल्ला आणि भाजपवरही टीकास्त्र

‘जय श्रीराम’च्या नाऱ्यावर चिडू नये, सेनेचा ममतादीदींना सल्ला आणि भाजपवरही टीकास्त्र

'पश्चिम बंगालातील राजकारण दिवसेंदिवस रोचक आणि रोमांचक होताना दिसत आहे, पण रोमांचक वाटणारे बंगालचे राजकारण शेवटी रक्तरंजित वळणावर पोहोचते हा आतापर्यंतचा इतिहास आहे

  • Share this:

मुंबई, 25 जानेवारी : 'स्वातंत्र्यलढ्यात प. बंगाल (west bengal), पंजाब (Punjab) व महाराष्ट्राचे (Maharashtra) नेतृत्व पुढे होते. आजही तीनही राज्ये स्वाभिमानासाठी लढत आहेत व केंद्र सरकार या तीनही राज्यांच्या विरोधात उभे ठाकले आहे.  स्वतःचे काहीच नाही. ज्यांच्याबरोबर लढायचे त्यांचेच लोक फोडून आपली फौज तयार करायची व जितं मय्याचा गजर करायचा. बिहारलाही तेच झाले. आता प. बंगालातही तृणमूल (turn mul congress) फोडून तृणमूलवर विजय मिळविण्यासाठी धडपड सुरू आहे' अशा शब्दांत शिवसेनेनं (Shivsena) भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल चढवला आहे.

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तृणमुल काँग्रेसविरोधात भाजप वाद पेटला आहे. याच मुद्यावरून ममतादीदींच्या बाजू घेत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर टीकास्त्र सोडण्यात आले आहे.

'पश्चिम बंगालातील राजकारण दिवसेंदिवस रोचक आणि रोमांचक होताना दिसत आहे, पण रोमांचक वाटणारे बंगालचे राजकारण शेवटी रक्तरंजित वळणावर पोहोचते हा आतापर्यंतचा इतिहास आहे. हिंदुत्वाच्या मुद्यांवर ठरवून ठिणगी टाकायची, हे भाजपने ठरवलेले आहे. तसे नसते तर कोलकात्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती कार्यक्रमात वादांची ठिणगी पडली नसती. शासकीय कार्यक्रमात पंतप्रधान व्यासपीठावर असताना मुख्यमंत्री ममता बोलायला उभ्या राहिल्या, तेव्हा ‘जय श्रीराम’चे नारे गर्दीने दिले. ममता बॅनर्जी यावर चिडल्या व हा आपला अपमान असल्याचे त्यांनी माईकवरूनच सांगितले. ममता बॅनर्जी यांचा ‘वीक पॉइंट’ बंगाल भाजपने ओळखला आहे व निवडणुका होईपर्यंत ते अशा नाजूक विषयांवर मर्मभेद करीत राहतील. ‘जय श्रीराम’च्या नाऱ्यावर ममता चिडू नयेत, या मताचे आम्ही आहोत. उलट त्यांच्या सुरात सूर मिसळला असता तर डाव समोरच्यांवरच उलटला असता, पण प्रत्येक जण आपल्या व्होट बँकेचीच पखाली वाहत असतो' असा सल्लाच सेनेनं ममतादीदींना दिला.

'टागोरांप्रमाणे दाढी वाढलेले पंतप्रधान मोदीही काल कोलकात्यात येऊन गेले. निवडणुकांत कोणीतरी जिंकेल व कोणीतरी हरणारच आहे. हिंदुस्थानी लोकशाही ‘ट्रम्प छाप’ नाही. कौल हा स्वीकारावाच लागतो. पण कौल आपल्या बाजूने वळावा, यासाठी जे अघोरी प्रयोग आपल्या लोकशाहीत केले जातात ते असह्य ठरतात. उत्तर प्रदेश, बिहारप्रमाणेच प. बंगालात भाजपने धार्मिक फाळणी सुरू केली आहे', अशी टीका सेनेनं केली.

तसंच, 'भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख लोकांनी हिंसाचार व दहशतवाद माजविण्याची भाषा बंगालात सुरू केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांची भाषणे, निवेदने यात वापरली जाणारी भाषा लोकशाहीस शोभणारी नाही. ममता बॅनर्जी यांना रॉयटर्स इमारतीसमोर जाळू इतकेच बोलायचे आज बाकी राहिले आहे. प. बंगालात बॉम्बचे कारखाने आहेत व त्यांना ममता सरकारचा पाठिंबा आहे, असे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून कोलकात्यात येऊन सांगितले गेले. मग जसे ईडी वगैरेंकडून राज्याराज्यांत जाऊन विरोधकांवर छापे मारले जातात तसे छापे केंद्रीय सुरक्षा पथकाने बंगालातील बॉम्बच्या कारखान्यांवर का मारले नाहीत, हा प्रश्नच आहे. शेवटी राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत कोणतीच तडजोड करता कामा नये. बॉम्बचे कारखाने नक्की कुठे आहेत व त्यावर केंद्राने नक्की काय कारवाई केली, त्याचा जाब खासदारांनी संसदेत विचारायला हवा' असं म्हणत सेनेनं भाजपवर टीका केली आहे.

'प. बंगालचे महामहिम राज्यपाल जगदीश धनकर यांची ख्याती काय वर्णावी! महाराष्ट्राच्या राजभवनात भाजपप्रेमापायी जे सुरू आहे, तेच अधिक प्रखरतेने कोलकात्याच्या राजभवनात सुरू आहे. प. बंगालात अल कायदाचे जाळे वेगाने पसरत असल्याचा आरोप राज्यपाल जगदीश धनकर यांनी जाहीरपणे केला. ममता बॅनर्जी यांचे सरकार आणि प्रशासन काय करीत आहे, अशी राजकीय चिंता त्यांनी व्यक्त केली. राज्यपालांचे काम हे गृहखात्यात अहवाल पाठवण्याइतकेच आहे. प. बंगालात अल कायदाचे जाळे वाढले आहे, याबाबतचा तपशील राज्यपालांनी कोणत्या माध्यमातून गोळा केला? एखादी खासगी यंत्रणा नेमून त्यांनी अल कायदाबाबत माहिती गोळा केली असेल तर त्यांनी मुख्यमंत्री बॅनर्जी यांच्याशी त्याबाबत चर्चा करायला हवी. तसे न करता राज्यपाल ही माहिती प्रसिद्धीमाध्यमांना देतात व लोकांत भय निर्माण करतात, हे मन साफ असल्याचे लक्षण नाही' असा टोलाही सेनेनं भाजपला लगावला.

'तृणमूल काँग्रेस फोडून भाजपमध्ये मेगाभरती सुरू आहे. ममता कॅबिनेटमधील वनमंत्री रजीब बॅनर्जी यांनी राजीनामा दिला आहे. त्याआधी आणखी दोन प्रमुख मंत्र्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तृणमूल काँग्रेस फोडायची, खिळखिळी करायची व तृणमूलचेच आमदार फोडून त्यांना भाजपची उमेदवारी द्यायची. 2014 साली महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोक तालुका, जिह्यात याच पद्धतीने फोडून भाजपने त्यांना उमेदवाऱ्या दिल्या. त्यातले बरेच लोक निवडून आले. अशा तऱ्हेने भाजपने आपला आकडा फुगवला. जे महाराष्ट्रात घडले, तेच प. बंगालात घडताना दिसत आहे' अशी टीकाही सेनेनं भाजपवर केली.

Published by: sachin Salve
First published: January 25, 2021, 8:05 AM IST
Tags:

ताज्या बातम्या