Home /News /mumbai /

इतकं सारं होऊनही शिवसेना खासदारांची उद्धव ठाकरेंकडे 'ही' मागणी, सेनेला पुन्हा झटका?

इतकं सारं होऊनही शिवसेना खासदारांची उद्धव ठाकरेंकडे 'ही' मागणी, सेनेला पुन्हा झटका?

ज्या भाजपमुळे ठाकरे सरकार अडीच वर्षात कोसळलं, त्याच पक्षाच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी लेखी मागणी शिवसेना खासदाराने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केली आहे.

  मुंबई, 5 जुलै : ज्या भाजपमुळे शिवसेनेतील 40 आमदारांनी बंडखोरी केली. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. ठाकरे सरकार अडीच वर्षात कोसळलं. त्याच भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा देण्याची मागणी खुद्द शिवसेना खासदारानेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. आदिवासी समाजातील सक्षम आणि कतृत्त्ववान महिला म्हणून शिवसेनेने भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी लेखी मागणी खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे केली आहे. याविषयीचे पत्र खासदार शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना भवनात भेट घेऊन त्यांना सादर केले. काय आहे खासदार शेवाळे यांचं पत्र? आपल्या पत्रात खासदार शेवाळे यांनी द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्या संवेदनशील सामाजिक आणि यशस्वी राजकीय वाटचालीची प्रशंसा केली आहे. तसेच वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षीय राजकारणाला छेद देत, महाराष्ट्राची कतृत्त्ववान महिला देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान व्हावी, याच हेतूने माजी राष्ट्रपती माननीय प्रतिभाताई पाटील यांना राष्ट्रपती पदासाठी पाठिंबा दर्शविला होता. तसेच दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कतृत्त्वाचा आदर करत त्यावेळी देखील शिवसेनेने त्यांना पाठिंबा दर्शविला होता. हीच परंपरा कायम ठेवत, आदिवासी समाजातील एका कतृत्त्ववान महिलेचा सन्मान करण्यासाठी शिवसेना पक्षाने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा आणि त्यासाठी पक्षाच्या सर्व खासदारांना आदेश द्यावा, अशी विनंती खासदार शेवाळे यांनी पक्षप्रमुखांकडे केली आहे.

  काल माईक खेचला, उद्या काय खेचतील माहिती नाही, उद्धव ठाकरेंचे खोचक चिमटे

  देशाला सर्वात तरुण राष्ट्रपती मिळणार जर द्रौपदी मुर्मू देशाच्या पुढील राष्ट्रपती झाल्या तर त्या भारताच्या सर्वात तरुण राष्ट्रपती असतील. द्रौपदी मुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 रोजी झाला. त्या 64 वर्षांच्या आहेत. 25 जुलै रोजी जेव्हा त्या पदाची शपथ घेतील तेव्हा त्यांचे वय 64 वर्षे, 1 महिना, 8 दिवस असेल. द्रौपदी मुर्मू यांच्या आधी देशाच्या सर्वात तरुण राष्ट्रपतीचा विक्रम नीलम संजीव रेड्डी यांच्या नावावर होता, ज्यांची 1977 मध्ये बिनविरोध निवड झाली होती. त्यांनी अध्यक्षपद स्वीकारले तेव्हा त्यांचे वय 64 वर्षे 2 महिने 6 दिवस होते. द्रौपदी मुर्मू या पहिल्या आदिवासी नेत्या राष्ट्रपती असतील राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेताच द्रौपदी मुर्मू आणखी एक विक्रम करणार आहेत. देशाच्या या घटनात्मक पदावर आदिवासी समाजाचा एकही नेता येऊ शकला नाही. द्रौपदी मुर्मू या आदिवासी नेत्या आहेत. या समाजातून आजवर देशाला एकही पंतप्रधान मिळाला नाही किंवा राष्ट्रपतीही मिळालेला नाही. मुर्मू या निवडणुकीत विजयी झाल्या तर त्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती होण्याचा विक्रम नावावर करतील. मुर्मू यापूर्वी 2015 ते 2021 पर्यंत झारखंडच्या राज्यपाल होत्या. स्वतंत्र भारतात जन्म घेणारा पहिला राष्ट्रपती देशाला मिळणार द्रौपदी मुर्मू या स्वतंत्र भारतात जन्मलेल्या देशाच्या पहिल्या राष्ट्रपती असतील. देशात आतापर्यंत घटनात्मक राष्ट्रपतीपद भूषविलेल्या सर्वांचा जन्म 1947 पूर्वी झाला होता. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचाही जन्म 1 ऑक्टोबर 1945 रोजी झाला होता. 2014 पर्यंत देशाच्या राष्ट्रपती आणि पंतप्रधान या दोन सर्वोच्च पदांवर विराजमान झालेल्या नेत्यांचा जन्म 1947 पूर्वी झाला होता.
  Published by:Rahul Punde
  First published:

  Tags: Shivsena, Uddhav thackarey

  पुढील बातम्या