Home /News /mumbai /

महाविकास आघाडीत निधीवरुन धुसफूस, श्रीकांत शिंदे यांचं मोठं विधान

महाविकास आघाडीत निधीवरुन धुसफूस, श्रीकांत शिंदे यांचं मोठं विधान

खासदार श्रीकांत शिंदे

खासदार श्रीकांत शिंदे

महाविकास आघाडीत धुसफूस असल्याच्या बातम्या दर महिन्याला समोर येत असतात. यावेळी देखील महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या नाराजीची बातमी समोर आली आहे.

मुंबई, 29 मे : महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) धुसफूस असल्याच्या बातम्या दर महिन्याला समोर येत असतात. यावेळी देखील महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या नाराजीची बातमी समोर आली आहे. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी महाविकास आघाडीबाबत महत्त्वाचं आणि खळबळजनक वक्तव्य केलं आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्रिसूत्री कार्यक्रम पाळला जात नाही. निधी वाटपाबाबत ठरलेला फॉर्म्युला वापरला जात नाही. आपण याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे तक्रार करणार, असं धक्कादायक विधान श्रीकांत शिंदे यांनी केलेलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत सारं काही आलबेल नाही, अशी चर्चा सुरु झाली आहे. श्रीकांत शिंदे नेमकं काय म्हणाले? "जेव्हा महाविकास आघाडी स्थापन झाली तेव्हा काही नियम, त्रिसूत्री मांडलं गेलं होतं. मंत्रिपदाचं समसमान वाटप केलं गेलं होतं. त्याचबरोबर निधीचं समसमान वाटप करण्याचं ठरलं होतं. 60-20-20 असा फॉर्म्युला निधीचा ठरलेला होता. जिथे एखाद्या पक्षाचे पालकमंत्री असतील तिथे दुसऱ्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींना कमीतकमी 20 टक्के निधी मिळायला हवा. सातारा जिल्ह्यात हे आढळलं नाही. शिवसंपर्क अभियानातून करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून हे समोर आलं आहे. या सगळ्या गोष्टींचा देखील विचार बाकी पक्षांनी केला पाहिजे. या गोष्टी आम्ही पक्षप्रमुखांपर्यंत घेऊन जाणार आहोत", असं श्रीकांत शिंदे म्हणाले. (अखेर 'त्या' वक्त्यावर चंद्रकांत पाटलांकडून दिलगिरी व्यक्त, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना भावनिक पत्र) "महाविकास आघाडी एकत्र मिळून काम करते. महाविकास आघाडीने एक वेगळा आदर्श तयार केला आहे. तो आपल्याला पुढे घेऊन जायचा असेल तर आपले जे सहकारी पक्ष आहेत त्यांच्यावरही अन्याय होता कामा नये. यासाठी महाविकास घाडीतील जे घटक पक्ष आहेत त्यांनी विचार करणं आवश्यक आहे. तरंच ही महाविकास आघाडी मजबूतपणे पुढे जाऊ शकते", असंदेखील श्रीकांत शिंदे म्हणाले. प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया दरम्यान, भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी श्रीकांत शिंदे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. "शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी अशी भूमिका मांडली आहे कि राष्ट्रवादी ही शिवसेनेला डावलत असते. जिथे राष्ट्रवादीचा आमदार निवडून येऊ शकतो तिथे राष्ट्रवादी शिवसेना आणि कॉंग्रेसला चिरडून टाकत आहे. यातूनच श्रीकांत शिंदे यांचे हे वक्तव्य असावे", असं वक्तव्य प्रवीण दरेकरांनी केलं आहे.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या