मुंबई, 15 ऑक्टोबर : सामनाच्या अग्रलेखातून (Saamana Editorial) शिवसेनेने (Shiv Sena) पुन्हा एकदा भाजपवर (BJP) टीकेचे बाण सोडले आहेत. शिवसेना हा एक ज्वलंत विचार आहे. सदैव उसळणारा ज्वालामुखीच आहे. शिवसेनेमुळे राजकीय विरोधकांची झोप उडाली असून त्यांना मोगलांच्या घोड्याप्रमाणे जळी-स्थळी शिवसेनाच दिसू लागली आहे. ही वाताहत पाहून आम्हाला या मंडळींची कीव करावीशी वाटते. विचारांचे सोने लुटा, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी शत्रुत्व करू नका असे त्यांना सांगण्याचीच सोय नाही असं अग्रलेखात म्हटलं आहे. …तशी भाजपची अवस्था झालीय अग्रलेखात पुढे म्हटलं, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यापासून कळपात वाघ शिरल्यावर मेंढरांची अवस्था होते तशी अवस्था भारतीय जनता पक्षाची झाली आहे. सध्या या मंडळींची जी बेताल वक्तव्ये चालली आहेत त्या बातम्या वाचून आणि ऐकून लोकांची तर खूप करमणूक होत असते. पुन्हा ‘धाड’ प्रयोगही सुरूच आहेत. वाचा : पोलीस उपनिरीक्षक होण्याचे हवालदारांचे स्वप्न आता पूर्ण होणार, मुख्यमंत्र्यांनी घेतला महत्त्वपूर्ण निर्णय हे सरकार नीट चालू नये म्हणून दिल्लीश्वरांनी मोठा खटाटोप महाराष्ट्र हा सोन्यासारखा प्रदेश आहे. हे राज्य कायम तेजस्वी सूर्यासारखे तळपत राहिले. त्याच तेजाची माणसे येथे जन्मास आली. त्यामुळे विचारांचे सोने महाराष्ट्रात सदैव उधळत राहिला. दोन वर्षांपासून महाराष्ट्रात ‘ठाकरे’ सरकार काम करत आहे. हे सरकार नीट चालू नये म्हणून दिल्लीश्वरांनी मोठा खटाटोप आणि आटापिटा चालवला आहे. खोटेपणाची सर्व आयुधे वापरून सरकारच्या पाठीत घाव घालण्याची एकही संधी राजकीय विरोधकांनी सोडली नाही. त्या सगळ्यांना चोख उत्तर देण्यासाठी महाराष्ट्राला शमीच्या झाडावरील शस्त्रे आता काढावीच लागतील असंही सामना अग्रलेखात म्हटलं आहे. हे ‘व्यापारी’ सरकार कोणत्याही थराला जाऊ शकते केंद्र सरकारने कोळशाच्या बाबतीत जो ढिसाळ आणि भ्रष्ट कारभार केला त्यामुळे महाराष्ट्रासह पाच राज्ये अंदारात ढकलली जातात की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. एकाएकी ही कोळसा टंचाई का निर्माण झाली? केंद्र सरकारने मर्जीतल्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी कृत्रिम कोळसा टंचाई निर्माण केली की काय? असे प्रस्न विचारले जात आहेत. कारण केंद्र सरकारवर लोकांचा विश्वास राहिलेला नाहीये. उद्योगपतींच्या फायद्यासाठी हे ‘व्यापारी’ सरकार म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी कोणत्याही थराला जाऊ शकते असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. वाचा : भाजपचा ‘दसरा स्पेशल’ कार्यक्रम, करणार सरकारच्या घोटाळ्याच्या पुतळ्याचे दहन याला काय स्वातंत्र्य म्हणायचे? केंद्रातील भाजप सरकार म्हणे आझादीचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. पण देशात बोलण्याचे, लिहिण्याचे स्वातंत्र्य आज खरेच उरले आहे का? जे सरकारला प्रश्न विचारतात. खडे बोल सुनावतात त्यांच्यावर सीबीआय, ईडी, एनसीबी, आयकर खात्याच्या धाडी घालून दहशत निर्माण केली जाते. खोटे गुन्हे दाखल करुन रावणी राज्याची पताकाच फडकवली जाते. याला काय स्वातंत्र्य म्हणायचे? शेतकऱ्यांना त्यांचे हक्क मागण्याचे स्वातंत्र्य नाही. आपले न्याय हक्क लोकशाही मार्गाने मागणाऱ्या शेतकऱ्यांना मंत्री पुत्र गाडीखाली चिरडून मारतात. पुन्हा शेतकऱ्यांना चिरडून मारणाऱ्या या गुन्हेगारांना अटक करा अशी मागणी करण्याचे स्वातंत्र्य राजकीय पक्षांना नाही. ती मागणी करणाऱ्या प्रियंका गांधींना तुरुंगात डांबले जाते. बेरोजगारांना काम करण्याचे स्वातंत्र्य नाही. विद्यापीठात मोकळेपणाने बोलण्याचे स्वातंत्र्य नाही. संपूर्ण देश जणू बंदिवान बनवला आहे. बेड्यांत जखडून टाकला आहे. कसली आहे आझादी? कसले स्वातंत्र्य उरले आहे? असा सवालही अग्रलेखातून विचारला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







