Home /News /mumbai /

विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी सुनील प्रभूंचा व्हीप जारी, आवाजी मतदान, कारवाईची टांगती तलवार, बंडखोरांचं काय होणार?

विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी सुनील प्रभूंचा व्हीप जारी, आवाजी मतदान, कारवाईची टांगती तलवार, बंडखोरांचं काय होणार?

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन शिवसेनेतील संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.

    मुंबंई, 2 जुलै : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन शिवसेनेतील संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील मुख्य शिवसेना (Shiv Sena) ही महाविकास आघाडीसोबत (Maha Vikas Aghadi) आहे. तर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील शिवसेना ही अर्थातच भाजपसोबत (BJP) आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दोन्ही बाजूने उमेदवार उभे करण्यात आले आहे. भाजपकडून मुंबईतील कुलाब्याचे आमदार राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे कोकणातील आमदार राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुख्य शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी शिवसेना आमदार राजन साळवी यांना मतदान करण्याबाबतचा देखील व्हीप लागू केला आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या बंडखोर आमदारांपुढे पेच वाढण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या सुनील प्रभूंचा व्हिप ऐकला नाही तर बंडखोर आमदारांविरोधात पक्षाकडून अधिकृतपणे कदाचित कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. तर दुसरीकडे भाजपसोबत सत्तेत असल्याने भाजप उमेदवार राहुल नार्वेकर यांना मतदान करणं शिंदे गटासाठी अनिवार्य असणार आहे. विशेष म्हणजे ही निवडणूक आवाजी मतदान पद्धतीने होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण कुणाला मतदान करतं हे उघडपणे स्पष्ट होणार आहे. (आता व्हीप कुणाचा? शिवसेना बजावणार, एकनाथ शिंदेंसह बंडखोरांना होणार लागू?) उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्व शिवसेनेच्या आमदारांसाठी व्हीप लागू केला आहे. हा व्हीप नियमानुसार सर्वच आमदारांसाठी लागू होणार आहे. पण शिवसेनेचे बंडखोर नेते सुनील प्रभू यांचा व्हीप मानतात की भाजपच्या उमेदवाराला मतदान करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेकडून विधीमंडळाचं गटनेतेपद हे अजय चौधरी यांना देण्यात आलं आहे. पण ते शिंदे गट मानण्यास तयार नाही. आपल्याला दोन तृतीयांश आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे आपणच शिवसेनेचे गटनेता असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. गटनेते पद आणि इतर तांत्रिक मुद्द्यांवरुन महाविकास आघाडी कोर्टात गेली आहे. कोर्टात या प्रकरणी खटला सुरु आहे. पण उद्या विधानसभेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन शिवसेना आणि बंडखोर यांच्यात संघर्ष बघायला मिळण्याची शक्यता आहे.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या