Home /News /mumbai /

शिवसेनेच्या 5 बंडखोर आमदारांना सूरतमध्ये मारहाण? गृह खात्याकडून मारहाणीची दखल

शिवसेनेच्या 5 बंडखोर आमदारांना सूरतमध्ये मारहाण? गृह खात्याकडून मारहाणीची दखल

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आमदार नितीन देशमुख यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप केला होता. त्यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

    मुंबई, 21 जून : शिवसेनेचे बंडखोर आमदार सध्या सूरतच्या एका हॉटेलमध्ये आहेत. हे सर्व आमदार शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुजरातला गेले आहेत. या आमदारांमध्ये नितीन देशमुख यांचादेखील समावेश आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आमदार नितीन देशमुख यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप केला होता. त्यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेनेच्या पाच आमदारांना सूरतमध्ये मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पाचही आमदारांना महाराष्ट्र परत यायचं होतं. त्यातूनच त्यांना मारहाण करण्यात आल्याचा दावा केला जातोय. विशेष म्हणजे या मारहाणीची गंभीर दखल गृह खात्याकडून घेण्यात आली आहे. ज्या आमदारांना मारहाण झाली आहे त्या आमदारांच्या नातेवाईकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी नितीन देशमुख यांना मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तसेच आणखी दोन आमदारांना मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अनेक आमदारांना परत यायचंय, राऊतांचा दावा दरम्यान, सूरतला गेलेल्या अनेक आमदारांना महाराष्ट्रात परत यायचं आहे. पण त्यांना येऊ दिलं जात नाहीय. अनेक आमदार गुजरातच्या सीमेवरही आले. पण त्यांना महाराष्ट्रात येऊ दिल जात नाही. त्यातूनच झालेल्या संघर्षात आमदारांना मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक दावा संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी या प्रकरणाची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दखल घ्यावी, अशीदेखील मागणी केली आहे. नितीन देशमुखांवर सूरतच्या रुग्णालयात उपचार सुरु या सर्व घडामोडी एकीकडे घडत असताना सूरतमध्ये नितीन देशमुख यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची देखील बातमी समोर आली आहे. नितीन यांना छातीत कळ येत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यासोबत रुग्णालयात एकनाथ शिंदे देखील आहेत. तसेच नितीन देशमुख यांच्या पत्नी देखील सूरतला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. नितीन देशमुख हे अकोल्यातील बाळापूरचे आमदार आहेत. नितीन देशमुख सूरतला गेल्यानंतर आज सकाळी त्यांच्या पत्नीने पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार केली होती. देशमुख यांचा फोन मंगळवारपासून बंद आहे, असं त्यांच्या पत्नीनं सांगितलं होतं. या दरम्यान, नितीन यांच्यावर ज्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत त्या रुग्णालयाबाहेर जमलेल्या नागरिकांना विचारलं असता त्यांनी धक्कादायक माहिती दिली. ज्याप्रकारे एखाद्याचं अपहरण केलं जातं त्याप्रकारे त्यांना आणलं गेलं. त्यांचं संपूर्ण कुटुंब अकोल्यात त्रस्त आहेत. ते सगळे सूरतच्या दिशेला रवाना झाले आहेत, अशी माहिती तिथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी दिली.
    Published by:Chetan Patil
    First published:

    Tags: Shiv sena

    पुढील बातम्या