मुंबई, 11 जुलै : राजकारणात कधी कुणी कुणाचे कायम शत्रू नाही, असं म्हणतात. असाच प्रकार हा होता तो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी एकमेकांच्या विरोधात राजकीय मैदान गाजवले पण मैत्री कायम राहिली. लॉकडाउनच्या काळात शरद पवार यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची प्रदीर्घ अशी मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रसिद्ध करण्यात आला आहे. या मुलाखतीत शरद पवारांनी कोरोनाची परिस्थिती, लॉकडाउन आणि राज्यातील राजकारणावर आपलं परखड मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी आपल्या मित्राची आठवणही सांगितली.
'कोरोना आणि लॉकडाऊनमुळे पहिले दोन महिने स्वस्थपणे घरामध्ये बसून होतो. बाळासाहेबांची कामाची पद्धत माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहीत आहे. ते काय दिवसभर घराच्या बाहेर पडून कुठे गेलेले असायचे असे नाही. अनेक वेळेला ते दिवस दिवस घरातच घालवायचे, पण ते घरात असतानासुद्धा सहकाऱ्यांना बरोबर घेऊन त्यांना प्रोत्साहित करून आलेल्या परिस्थितीला कसं तोंड द्यायचं हे बाळासाहेबांनी शिकवलं होतं असं मला वाटतं.' असं सांगत त्यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.
तसंच, 'माझ्यासारख्याला या दोन महिन्यांत बाळासाहेबांची आठवण अशासाठी येत होती की, आपण घरातून तर बाहेर पडायचं नाही, पण बाकीची कामं, ज्या दिशेने आपल्याला जायचंय त्या दिशेला जाण्याच्या प्रवासाची तयारी आपण केली पाहिजे. ते ज्या पद्धतीने बाळासाहेब करायचे त्याची आठवण या काळात आली' असंही पवारांनी सांगितलं.
त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव यांच्यातला फरकही पवारांनी सांगितला.
'मुख्यमंत्री ठाकरे यांनी लॉकडाउनचा घेतलेला निर्णय हा थोडा उशिरा घेतला असं काहींना वाटलं असेल, पण त्यांनी तो निर्णय योग्य वेळी घेतला. मुख्यमंत्र्यांचा जो स्वभाव आहे त्याच स्वभावाला साजेसाच हा निर्णय आहे. म्हणजे निर्णय घ्यायचाच, पण अत्यंत सावधगिरीने. निर्णय घेतल्यावर दुष्परिणाम होणार नाहीत याची खातरजमा जेवढी करून घेता येईल तेवढी करून घ्यायची आणि मग पाऊल टाकायचं. एकदा पाऊल टाकल्यावर मागे घ्यायचं नाही ही त्यांची कार्यपद्धती आहे. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीत हा फरक आहे आणि तसा तो राहणारच' असं मत त्यांनी दोन्ही नेत्यांबद्दल व्यक्त केलं.
कोरोनावर वरदान ठरलेले 5 हजाराचे इंजेक्शन तब्बल 21 हजाराला, 2 जणांना अटक
'बाळासाहेब हे प्रत्यक्ष सत्तेत नसले तरी सत्तेच्या पाठीमागचे एक मुख्य घटक होते. त्यांच्या विचाराने सत्ता महाराष्ट्रात आली हे महाराष्ट्राने आणि देशाने बघितलं. आज विचाराने सत्ता आली नाही, पण सत्ता प्रत्यक्ष कृतीत आणण्याच्या संबंधीची जबाबदारी आताचे मुख्यमंत्री ठाकरे यांची आहे. हा फरक महत्त्वाचा आहे.' असं निरीक्षणही पवारांनी नोंदवलं.