मुंबई, ३० जून : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी तब्बल ३९ आमदारांना घेऊन शिवसेनेमध्ये बंड पुकारला. एवढ्या मोठ्या संख्येनं आमदारांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेसह (shivsena) महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackery) यांना याची माहिती कशी नव्हती? असे सवालही उपस्थितीत झाले होते. पण, उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी 4 वेळा बंडखोरी होणार असं सांगितलं असल्याचे समोर आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अखेर कोसळले आहे. एकनाथ शिंदे यांनी आमदारांना घेऊन आधी सुरत आणि नंतर गुवाहाटीमध्ये मुक्काम ठोकला होता. मध्यंतरी हे बंड शिवसेनेकडूनच प्रायोजित असल्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली होती. मात्र, खुद्द शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना याबद्दल माहिती होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच ४ वेळा शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे हे बंडखोरी करणार आहे, अशी माहिती दिली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडून सहा वेळा पक्षात बंडखोर होणार असल्याची माहिती दिली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. गुप्तचर यंत्रणेनं दिलेल्या माहितीच्या आधारे ही माहिती आता समोर आली आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर आता सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे हे गोव्याहून मुंबईकडे निघाले आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आज दुपारी ३ः३० वाजता राजभवनावर जाणार आहे. यावेळी फडणवीस आणि शिंदे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर फडणवीस सरकारचा आज संध्याकाळी किंवा उद्या शुक्रवारी शपथविधी होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे शपथ घेतील. त्यांच्यासोबत इतर आणखी ५ नेते हे मंत्रिपदाची शपथ घेण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.