Home /News /mumbai /

'देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, हा तर आश्चर्याचा धक्का', शरद पवारांनी डिवचलं

'देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, हा तर आश्चर्याचा धक्का', शरद पवारांनी डिवचलं

देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी लागली. हा तर आश्चर्याचा धक्का होता. पण भाजपमध्ये एकदा आदेश झाला की त्यामध्ये तडजोड नाही, असं म्हणत शरद पवारांनी फडणवीसांना टोला लगावला.

    मुंबई, 30 जून : भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, अशी शक्यता होती. पण त्यांनी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, असं घोषित केलं. त्यानंतर भाजपच्या केंद्रीय कमिटीने दिलेल्या आदेशानुसार देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी लागली. या सर्व घडामोडींवर राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी फडणवीसांना डिवचलं. भाजपमध्ये एकदा आदेश आला की तो पाळावा लागतो. देवेंद्र फडणवीस राज्याचे पाच वर्ष मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी अडीच वर्ष विरोधी पक्षनेते म्हणून काम केलं. तरीही त्यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी लागली. हा तर आश्चर्याचा धक्का होता. पण एकदा आदेश झाला की त्यामध्ये तडजोड नाही, असं म्हणत शरद पवारांनी फडणवीसांना टोला लगावला. शरद पवार नेमकं काय म्हणाले? "राज्यातील विधानसभेचे 38-39 सदस्य आसाममध्ये गेले होते. त्यामध्ये राज्याचं नेतृत्व बदलाची आणि कुणालातरी मुख्यमंत्रिपदावर काम करण्याची संधी मिळावी, अशी मागणी असावी. भाजपमध्ये एकदा आदेश आला की, मग तो दिल्लीचा असेल किंवा नागपूरचा आला असेल तर त्यामध्ये तडजोड नसते. त्यामुळे आदेश आला आणि राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी शिंदेंवर पडली. याची कल्पना कदाचित एकनाथ शिंदे यांनाही नसावी", असं शरद पवार म्हणाले. "दुसरं आश्चर्य हे खरंतर ते आश्चर्य नाही कारण पुन्हा या कार्यपद्धतीत आदेश हा एकदा दिल्यानंतर तो आदेश तंतोतंत पाळावा लागतो. त्याचं उत्तम उदाहरण देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री होते त्यांनी पाच वर्ष काम केलं. नंतर त्यांनी विरोधी पक्षनेत्याचं काम केलं. त्यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी लागली. हा तर आश्चर्याचा धक्का होता. पण एकदा आदेश झाला आणि सत्तेची कोणतीही संधी मिळाली की ती स्वीकारायची असते याचं उदाहारण देवेंद्र फडणवीसांनी घालून दिलं आहे", असं देखील शरद पवार म्हणाले. (VIDEO : 'नाथांचा नाथ एकनाथ!', शिवसेना आमदारांचा आनंद गगनात मावेना, गोव्याच्या हॉटेलमध्ये फुल सेलिब्रेशन) दरम्यान, शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि धर्मवीर आनंद दिघे (Aanand Dighe) यांना वंदन करुन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे हे राज्याचे 20 वे मुख्यमंत्री ठरले आहेत. मुंबईतील राजभवनात दरबार हॉलमध्ये हा शपथविधी कार्यक्रम अतिशय साध्या पद्धतीने पार पडला. एकनाथ शिंदे यंच्यासह देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीच्या कार्यक्रमाला भाजपचे काही नेते, पत्रकार उपस्थित होते. "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब, मी एकनाथ संभाजी शिंदे ईश्वरसाक्षी शपथ घेतो की, कायद्याद्वारे स्थापित झालं आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा आणि निष्ठा राखीन. मी भारताची सार्वभौमत्व आणि एकात्मता राखीन. मी महाराष्ट्राच्या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक आणि शुद्ध बुद्धीने पार पाडेन. संविधान आणि कायद्यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना निर्भयपणे, तसेच कोणत्याही विषयी ममत्व भाव किंवा आकष न बाळगता न्यायाची वागणूक देईन", अशी शपथ एकनाथ शिंदे यांनी घेतली.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या