मुंबई, 3 जानेवारी : सध्या राज्यात छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक की धर्मवीर? यावरुन वाद सुरू आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर भाजपने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आंदोनल केले. या प्रकरणावरुन भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेला टोला लगावला होता. शिवसेना या वक्तव्याचा निषेध करणार नाही का? असा सवाल करत राऊतांवरही टीकास्त्र सोडलं होतं. यावरुन आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आशिष शेलार यांच्यासह भाजपवर बाण सोडले. “आशिष शेलार हे शंकराचार्य आहेत का? त्यांनी आधी महाराजांचा अपमान करणाऱ्या भाजप नेत्यांची हकालपट्टी करावी”, असा हल्लाबोल राऊत यांनी केला. संजय राऊत यांची थेट मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांवर टीका छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारे भाजपचे राज्यपाल यांना परत पाठवले पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी साधा निषेधसुद्धा केला नसल्याची टीका राऊत यांनी केली. आशिष शेलार यांच्या टीकेला उत्तर देताना आशिष शेलार हे शंकराचार्य आहेत का? त्यांनी आधी महाराजांचा अपमान करणाऱ्या भाजप नेत्यांची हकालपट्टी करावी आणि मग बोलावे, असं उत्तर राऊत यांनी दिले. वाचा - ठरलं! मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना-वंचितची युती; आंबेडकरांनी सांगितला जागेचा फॉर्म्युला नोटबंदी हत्याकांड : राऊत नोटबंदीवर बोलताना राऊत म्हणाले, की प्रकाश आंबेडकर यांच्या मताशी मी सहमत आहे. नोटांवर बंदी घालण्यात आली. त्यावेळी अनेकांची हत्या झाली, नुकसान झाले. नोटबंदी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेली कारणं अजून तशीच आहेत. बनावट नोटा वाढल्या, त्यामुळे नोटबंदी वैध कशी? या न्यायमूर्तींच्या मताशी सहमत असल्याचे राऊत यांनी सांगितले. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांच्या मुंबई दौऱ्याला विरोध नाही. मुंबई औद्योगिक शहर आहे. गुंतवणूक बाबतीत चर्चेला आमचा विरोध नाही. राज्याबद्दलही विरोध नाही. फक्त आमचा विकास ओरबाडून नेऊ नका, असा टोला लगावला.
आमच्या सुरक्षा काढून घेतल्या : राऊत फुटीर आमदारांच्या कुत्र्या मांजराला देखील सुरक्षा देण्यात आली आहे. मात्र, विरोधी पक्षांच्या महत्वाच्या नेत्यांना सुरक्षा नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरातील सुरक्षा बघा, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.