'हा तर राजकीय लफंगेगिरीचा कळस', शिवसेनेचा फडणवीसांसह मोदी सरकारवर घणाघात

'हा तर राजकीय लफंगेगिरीचा कळस', शिवसेनेचा फडणवीसांसह मोदी सरकारवर घणाघात

दूध भुकटीची आयात थांबवा ही शेतकर्‍यांची पहिली मागणी आहे व ती केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात आहे. महाराष्ट्रातील भाजप पुढारी त्यावर का बोलत नाहीत?

  • Share this:

मुंबई, 03 ऑगस्ट : 'दूध भुकटी आयातीचा निर्णय रोखावा. महाराष्ट्र, गुजरातसारख्या राज्यांच्या ताकदीवरच केंद्राचे दुकान चालले आहे. त्यामुळे पेटलेल्या दुधाचा भडका थांबवा आणि दुधात पेट्रोल ओतणार्‍या विरोधी नेत्यांना आवरा, सत्ता गेल्याने त्यांची डोकी कामातून गेली आहेत' असं म्हणत शिवसेनेनं दूध दरवाढीवर आंदोलन करणाऱ्या भाजप नेत्यांवर सडकून टीका केली आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून दूध आणि भुकटीच्या दरवाढीबाबत आंदोलनावर शिवसेनेनं आपली भूमिका मांडली आहे. यावेळी केंद्राकडून मदत मागत भाजप नेत्यांवर सडकून टीका केली आहे.

'दूध भुकटीची आयात थांबवा ही शेतकर्‍यांची पहिली मागणी आहे व ती केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात आहे. महाराष्ट्रातील भाजप पुढारी त्यावर का बोलत नाहीत?  दूध भुकटीचा विषय फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, तो इतरही राज्यांत तितकाच महत्त्वाचा आहे, पण भाजपशासित राज्यांत दूध उत्पादक शेतकर्‍यांचे प्रश्न वार्‍यावर सोडले आहेत. शेतकर्‍यांना दूध भाव मिळावा, पण त्यासाठी केंदाने तत्काळ महाराष्ट्राला निधी द्यावा' अशी मागणी सेनेनं केली आहे.

'दुधावर ज्यांनी राजकीय व आर्थिक साम्राज्ये उभी केली, त्यांनी हा विचार सहानुभूतीने केला असता तर सध्याचे दूध आंदोलन इतके टोकास गेले नसते व सरकार विरोधकांच्या हाती कोलीत सापडले नसते. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एक मायाळू व कनवाळू पुढारी आहेत. त्यांचे मन लोकांच्या दुःखाने लगेच द्रवते. महाराष्ट्रातील साखर कारखानदारीचा प्रश्न निर्माण होताच फडणवीस हे पलटीमार साखर कारखानदारांना घेऊन दिल्लीस गेले, अमित शहांच्या कानी साखर कारखानदारांचे प्रश्न घातले. तसेच त्यांनी आता दूध उत्पादकांच्या बाबतीत केले पाहिजे. राज्याचे अर्थमंत्री, कृषी-दूध उत्पादक मंत्र्यांचे शिष्टमंडळ घेऊन त्यांनी बेशक दिल्लीस जावे व दूध उत्पादक शेतकर्‍यांसाठी पाच-पंधरा हजार कोटींची तरतूद करून आणावी' असा सणसणीत टोला फडणवीसांना लगावण्यात आला आहे.

राजू शेट्टींची बाजू, फडणवीसांना टोला

'महाराष्ट्राचे दिल्लीकडून येणे आहेच व फडणवीसांनी हस्तक्षेप केल्याशिवाय ते देणार नाहीत, असा करार झालेला दिसतो. सध्या शेतकर्‍यांच्या दुधाला मिळणार्‍या दरात गाईच्या चार्‍याचा खर्चही निघत नाही, सरकारकडूनही कुठलेच अनुदान मिळत नाही असे सोपे गणित शेतकर्‍यांचे नेते राजू शेट्टी यांनी मांडले आहे, पण राजू शेट्टी हे सरकारी आंदोलक आहेत, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी मारला आहे. फडणवीस हे विसरतात की, कालपर्यंत हेच शेट्टी फडणवीस यांच्या गोटात होते. तेव्हा ते सरकारी नव्हते काय? राजू शेट्टी यांनी बारामतीत जाऊन शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन केले तेव्हा याच शेट्टींना फडणवीस खांद्यावर घेऊन मिरवत होते' असं म्हणत राजू शेट्टींची बाजू घेत फडणवीसांवर टीका करण्यात आली.

'हा तर राजकीय लफंगेगिरीचा कळस'

'आज शेट्टी यांची जागा सदाभाऊ खोतांनी घेतली. खोतांनी पांडुरंगाच्या चरणी दुधाचा अभिषेक केला व शेतकर्‍यांच्या मागण्या देवासमोर ठेवल्या.  खोत वगैरे मंडळी सहा महिन्यांपूर्वी सरकारमध्ये होती व तेव्हा त्यांनी याबाबत काहीच पावले उचलली नाहीत. आज ते रस्त्यावर उतरले आहेत, दुधाचे टँकर फोडत आहेत, दुधाची नासाडी करीत आहेत. किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या मागण्यांचा आदर करायला हवा, पण पैसे केंदानेच द्यायला हवेत. आंदोलन फक्त अनुदानाचे नाही, तर सरकारी धोरणास विरोध करण्याचे सुद्धा आहे हे समजून घेतले पाहिजे.राजू शेट्टी हे सरकारी आंदोलक आहेत हे एकवेळ मान्य करू, पण केंद्र सरकारने दूध भुकटीच्या आयातीस दिलेल्या परवानगीला विरोध न करणे हा तर राजकीय लफंगेगिरीचा कळस आहे.' अशी जळजळीत टीकाही मोदी सरकारवर करण्यात आली.

 महाराष्ट्रातील भाजप पुढारी त्यावर का बोलत नाहीत?

'26 जून रोजी केंद्रातील मोदी सरकारने अध्यादेश काढून परदेशांतून 10 लाख टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या गळय़ाला फास लावणारा आहे. देशाच्या गोदामात लाखो टन दूध पावडर पडून असताना अमेरिकेचे हित पाहण्यासाठी त्यांची दूध पावडर घ्यायची हा देशी शेतकर्‍यांवर अन्याय आहे. दूध भुकटीची आयात थांबवा ही शेतकर्‍यांची पहिली मागणी आहे व ती केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात आहे. महाराष्ट्रातील भाजप पुढारी त्यावर का बोलत नाहीत?' असा थेट सवालही सेनेनं भाजपला विचारला आहे.

Published by: sachin Salve
First published: August 3, 2020, 9:13 AM IST
Tags:

ताज्या बातम्या