मुंबई, 10 मार्च : दापोली रिसॉर्ट प्रकरणी अxमलबजाणी संचालनालय अर्थात ईडीने ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना अटक केली आहे. चार तासांच्या चौकशीनंतर कदम यांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, 5 दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे खेडमध्ये सदानंद कदम यांना भेटले होते. साई रिसॉर्ट प्रकरणी भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आज सदानंद कदम यांची दुपारी साडे तीन वाजल्या पासून चौकशी सुरू होती. अखेर चार तासांच्या चौकशीनंतर कदम यांना अटक करण्यात आली आहे. दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी पर्यावरण नियमांचं उल्लंघन आणि अवैध बांधकाम आणि इतर अनियमितततेच ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी मनी लाँड्रिंग झाल्याचा आरोप करत ED ने गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, सदानंद कदम यांच्यावरील या कारवाईनंतर ठाकरे गटानं ईडीवर जोरदार हल्लाबोल केला. रामदास कदमांचे भाऊ असलेले सदानंद कदम यांची ठाकरे गटासोबत जवळीक वाढली होती. 5 मार्चला खेडमधील सभेच्या दिवशी उद्धव ठाकरेंनी सदानंद कदम यांची दोनदा भेट घेतली होती आणि त्यानंतर पाचच दिवसात ईडीनं कारवाई केली. दरम्यान, ईडीनं कारवाई केलेले सदानंद कदम आणि आमदार अनिल परब हे व्यावसायिक पार्टनर आहेत. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि सदानंद कदम हे व्यावसायिक पार्टनर आहेत. 2017 मध्ये अनिल परबांकडून सदानंद कदमांनी रिसॉर्ट विकत घेतलं. 2019 मध्ये व्यवहाराचे खरेदी खत झाले होते. साई रिसॉर्टच्या बांधकामासाठी रोख रक्कम वापरण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयानं 31 जानेवारी 2022 रोजी साई रिसॉर्ट तोडण्याचे आदेश दिले होते. सदानंद कदम यांच्याविरोधातील कारवाईनंतर ठाकरे गट चवताळून उठला. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच सदानंद कदमांवर ईडीनं कारवाई केल्यानं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा नव्या वादाची पायाभरणी झाली. सदानंद कदमांवर कारवाईचा फास आवळला गेल्यानं आता अनिल परब यांच्याही अडचणी वाढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







