Home /News /mumbai /

'आमचा संयम तुटायची वाट बघू नका', दीपक केसरकरांचं राऊतांना सडेतोड प्रत्युत्तर

'आमचा संयम तुटायची वाट बघू नका', दीपक केसरकरांचं राऊतांना सडेतोड प्रत्युत्तर

शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

    मुंबई, 26 जून : शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊतांनी आज गुवाहाटीत गेलेल्या आमदारांवर अतिशय खालच्या दर्जाच्या टीका केली. त्यांच्या या टीकेवरुन दीपक केसरकर चांगलेच भडकले. संजय राऊत यांनी आमच्या संयम तुटायची वाट बघू नये, असा इशारा दिला आहे. तसेच आमच्या कार्यालयांवर दगडफेक करु नका, असंदेखील आवाहन केसरकर यांनी केलं आहे. आमच्यात हिंमत होती म्हणून आम्ही इथ आलेलो आहोत, असंदेखील केसरकर म्हणाले. त्यांनी 'टीव्ही9 मराठी'ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी संजय राऊतांच्या टीकेवर भूमिका मांडली. दीपक केसरकर नेमकं काय म्हणाले? आम्ही एकच बापाचे आहोत आणि गुवाहाटीला गेलेले अनेक बापाचे आहोत, असं संजय राऊतांचं वाक्य होतं. हे वाक्य उच्चारु सुद्धा नये, इतकं ते घाणेरडं वाक्य आहे. जेव्हा तुम्ही म्हणता एखाद्या व्यक्तीला अनेक बाप आहेत असं म्हणता तेव्हा त्याचा अर्थ काय होतो? या महाराष्ट्राने महिलांचा नेहमी सन्मान केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी कल्याणच्या सुभेदाराचा पराभव केला त्यावेळी कल्याणच्या सुभेदाराच्या पत्नीला महाराजांनी आईची उपमा दिली होती. त्याच शिवाजी महाराजांचं नाव घेऊन चालणाऱ्या शिवसेनेमध्ये अशा तऱ्हेचा प्रवक्ता पक्षप्रमुखांना चालतो का? हा माझा प्रश्न आहे. मी आतापर्यंत शांत राहिलो. पण त्यांच्या या वक्तव्यातून काय अर्थ निघतो? ज्यांनी त्यांना राज्यसभेसाठी निवडून दिलं, त्यांना आमच्या मतांमुळेच राज्यसभेत जागा मिळाली आहे. त्यांनी आधी आपल्या राज्यसभेचा राजीनामा द्यावा मग असं विधान करावं. नंतर असं वक्तव्य करावं. अशी वक्तव्य कोण सहन करणार आहे? एखाद्याने तुमच्या कुटुंबावर असं बोलण्याचा अधितार राऊतांना कुणी दिला? शिवसेनेसोबत आमचे व्यक्तीगत मतेसुद्धा आहेत. आम्ही अशाप्रकारचे ऐकून घेऊ का? आमचे पोस्टमार्टम ते करणार आहेत. उद्धव ठाकरेंना त्यांचे असे विधानं चालतात का? उद्धव ठाकरे हे नुसते पक्षप्रमुख नाहीयत तर ते महाराष्ट्र राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत. दुसऱ्या एखाद्याने असं वक्तव्य केलं असतं तर तो जेलमध्ये असता. मी गृहखात्याचा मंत्री आहे. तुम्ही राज्याचे प्रमुख असतात तेव्हा तुमच्यावर वेगळी जबाबदारी असते. आम्हाला तुमच्यावर अभिमान आहे. पण अशा वक्तव्यातून कोणताही पक्ष मोठा होत नाही. शिवसैनिकांनाही संजय राऊतांची वक्तव्ये आवडत नाहीत. त्यांच्या अशा वक्तव्यामुळे अनेक लोकं दुखावले आहेत. आमच्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते येतात आणि त्यांचा उमेदवार जाहीर करतात. मग शिवसेना शिल्लक कशी राहणार आहे? हा आमचा प्रश्न आहे. आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही करुन दाखवू. तेवढी हिंमत आमच्यामध्ये आहे. म्हणून आम्ही निघून आलो. उगाच आमच्या ऑफिसवर जावून दगडफेक करु नका. त्यांनी एक लक्षात ठेवावं, बाकीचे उमेदवार होते म्हणून त्यांचे 56 निवडून आले. बाकीचे लोकं का पडले? त्याचा सुद्धा अभ्यास करावा. संजय राऊत यांची भाषा ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. शिवसेनेला एक चांगला प्रवक्ता इश्वराने द्यावा, अशी मी प्रार्थना करतो. त्यांचा तोल गेलेला आहे. ते अनेक बापांचे बोलले नसते तर मी त्यांच्याविरोधात कधीही बोललो नसतो. आमचा संयम तुटायची वाट बघू नका. तुम्ही कधीही निवडून आलेले नाहीत. तुम्हाला आम्हाला मेलेले बघायचं आहे. त्या मेलेल्या माणसांची मतं सोडून राजीनामा द्या. तुमचं आजचं पद आम्ही दिलेलं आहे.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या