मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या जीवनातील काही खास गोष्टी माहीत आहेत का?

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या जीवनातील काही खास गोष्टी माहीत आहेत का?

Ratan Tata 83rd Birthday: ज्येष्ठ उद्योगपती  रतन टाटांचा आज 83वा वाढदिवस, जाणून घेऊया त्यांच्याविषयी...

Ratan Tata 83rd Birthday: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांचा आज 83वा वाढदिवस, जाणून घेऊया त्यांच्याविषयी...

Ratan Tata 83rd Birthday: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांचा आज 83वा वाढदिवस, जाणून घेऊया त्यांच्याविषयी...

मुंबई, 28 डिसेंबर : आधुनिक भारताच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक जडणघडणीत अनेकांचा मोठा वाटा आहे. राजकीय नेत्यांचा जसा देशाला दिशा देण्याचा वाटा महत्त्वाचा तसाच उद्योग उभारून देशाचं आर्थिक चाक मजबूत करणाऱ्या उद्योगपतींचा वाटाही तितकाच मोठा असतो. पण अनेकदा आपल्याला राजकीय व्यक्तिमत्त्वांबद्दल माहिती असते तितकी माहिती उद्योगपती, शास्रज्ञ, शिक्षक यांच्याबद्दल नसते. महान उदयोगपती जमशेदजी टाटा हे असेच एक उद्योगपती. टाटा ग्रुपच्या अनेक कंपन्यांनी देशाच्या आर्थिक उभारणी मोलाचं योगदान दिलं आहे. जमशेदजींची परंपरा त्यांच्या पुढच्या पिढीनेही जपली, चालवली आणि वृद्धिंगत केली. जमशेदजींचे दत्तक नातू नवल टाटा (Naval Tata) यांचा मुलगा उद्योगपती रतन टाटा यांचंही नाव यात अग्रक्रमाने येतं. रतन टाटा यांचा आज वाढदिवस ते आज 83 वर्षांचे होत आहेत. रतन टाटांबद्दल आपण आज थोडी अधिक माहिती करून घेणार आहोत चला तर मग.

रतन यांचा जन्म आणि शिक्षण

सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) 28 डिसेंबर 1937 ला मुंबईत झाला. टाटा सन्सचे (Tata Sons) माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी विविध धोरणं अवलंबून वाढवलेला व्यवसाय आणि त्यांची परोपकारी वृत्ती यासाठी ते भारतातील सर्वांना परिचित आहेत. त्यांचं प्राथमिक शिक्षण मुंबईत झालं पण 1955 मध्ये त्यांनी न्यूयॉर्क सिटीतील रिव्हरडेल कंट्री स्कूलमधून पदवी घेतली. सन 1959 मध्ये न्यूयॉर्कमधील कॉर्नेल विद्यापीठातून त्यांनी आर्किटेक्चरची पदवी घेतली.

हे वाचा-प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांच्याकडे आहेत या कार्स; पाहा जबरदस्त कलेक्शन

रतन टाटांचं करिअर

रतन टाटांनी 1962 मध्ये टाटा ग्रुपमधून (Tata Group) करिअर सुरू केलं. तेव्हा त्यांचं वय फक्त 24 होतं. पहिल्यांदा त्यांनी टाटा स्टीलच्या एका दुकानात कर्मचारी म्हणून काम केलं. जेआरडी टाटांनंतर 1991 मध्ये रतन टाटा समूहाचे पाचवे अध्यक्ष झाले. त्यांच्या कारकीर्दित टाटा ग्रुपने टेटली, जग्वार लँड रोव्हर आणि कोरससारख्या कंपन्या विकत घेतल्या. भारतातील सामान्य माणसाची इच्छा रतन टाटा व्यवस्थित जाणत होते. सामान्य माणसाला कुटंबासोबत जायला एक कार असावी हे त्याचं स्वप्न रतन टाटा यांनी साकार केलं. नॅनो ही सामान्य माणसाला परवडेल अशी कार तयार करून बाजारात आणण्यात काम त्यांनीच केलं. एक लाख रुपयांत ही कार तेव्हा मिळत होती त्यामुळे अगदी मध्यमवर्गींयांच्या दारातही चारचाकी गाडी उभी राहिली. इंडिका ही कारही रतन यांच्याच कल्पनेतून तयार झाली.

टाटा कुटुंबियांशी नाही रक्ताचं नातं

रतन यांचं टाटा कुटुंबाशी रक्ताचं नातं नाही. नवल टाटा आणि त्यांच्या पत्नी नवजबाई सेठ यांचे दत्तकपुत्र म्हणजे रतन टाटा. रतन लहान असतानाच त्यांचे आई-वडिल विभक्त झाले. रतन यांचं आईवर खूप प्रेम होतं.

रतन यांनी केला व्यवसाय विस्तार

रतन टाटा जेव्हा कंपनीत रुजू झाले तेव्हा टाटा कंपनीची एकूण उलाढाल 10000 कोटी रुपये होती. 2011-12 या वर्षात टाटा कंपनीचा महसूल 475.721 कोटी रुपये झाला होता. आज जवळजवळ 80 देशांत सध्या टाटा ग्रुपच्या कंपन्या आहेत. कंपनीसाठी जे चांगलं आहे आणि जगासाठीही हिताचं आहे तेच करायचं असं रतन टाटांचं कायम धोरण होतं. त्यांनी भारतात प्रसिद्ध असलेले विकसित देशांतील ब्रँडही विकत घेतले.

हे वाचा-अन् 'तो' यशाचा टर्निंग पॉईंट ठरला! रतन टाटांनी असा घेतला होता अपमानाचा बदला

पद्मभूषण, पद्मविभूषण रतन टाटा

कंपनी, व्यवसायाबरोबरच समाजाच्या हिताचा सतत विचार करणं ही टाटा समूहाची खासियत आहे. ती खासियत राखत रतन टाटा यांनी 21 वर्षांच्या करिअरमध्ये टाटा उद्योग समूहाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. औद्योगिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेतल भारत सरकारने 2000 मध्ये त्यांना पद्भूषण आणि 2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवलं.

कर्मचाऱ्यांची काळजी घेणारा अध्यक्ष

जगभरातील कंपन्यांचे व्यवहार सांभाळणारे हे टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा एक कुटुंबप्रमुख म्हणूनही लोकांच्या कायम स्मरणात राहिले. 2008 मध्ये जेव्हा मुंबईतील टाटा उद्योग समूहाच्या हॉटेल ताजवर (Hotel Taj) दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी आपल्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी टाटा खंबीरपणे उभे राहिले. ज्या कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसला त्यांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस या कुटुंबप्रमुखाने केली होती. त्याचबरोबर हॉटेलच्या आजूबाजूला असलेल्या फेरीवाल्यांचा व्यवसाय पुन्हा उभारण्यासही टाटांनी मदत केली होती.

बोर्डाने नाकारली निवृत्ती

रतन टाटा यांचं नाव 2010 मध्ये प्रसिद्ध झालेल्या कॉर्पोरेट लॉबिस्ट नीरा राडिया (Neera Radia) प्रकरणातही घेण्यात आलं होतं. 2002 मध्ये 65 व्या वर्षी रतन निवृत्त होणार होते पण कंपनीने त्यांनी तशी परवानगी दिली नाही. तीन वर्षांनंतर कंपनीच्या बोर्डाने त्यांच्या निवृत्तीचं वय 75 वर्षं केलं. ही त्यांच्या कामाची पोचपावतीच म्हणावी लागेल.

विविध क्षेत्रांत कार्य

रतन टाटा यांनी टाटा उद्योग समूहाला नवी दिशा दिली. त्याचबरोबर फिलांथ्रोपिस्ट (Philanthropist) म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. शिक्षण, आरोग्य आणि ग्रामविकासाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्थांना टाटांनी मदत केली आहे. व्यवसाय आणि परोपकाराच्या क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. त्यांना उदंड आयुष्य लाभो याच त्यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.

First published:

Tags: Ratan tata