मुंबई, 10 जून : राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज मतदान (voting for Rajya Sabha Election) होत आहे. त्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) पक्षांनी मोर्चेबांधणी केलीय. तसेच विरोधी पक्ष भाजपनेही तिसरा उमेदवार रिंगणात उतरवून निवडणुकीत चांगलीच रंगत आणलीय. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात असल्याने एक-एक मताला चांगलेच महत्त्व प्राप्त झाले आहे. समाजवादी पक्षाचे अबू आझमी (Abu Aazmi) यांनी मविआला मतदान करण्याचं जाहीर केलं. मात्र, एमआयएमची (MIM) मते कुणाच्या पारड्यात पडणार? असा प्रश्न होता. पण आता हा सस्पेन्स संपला आहे. कारण एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MIM MP Imtiaz Jaleel) यांनी याबाबत खुलासा केला आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत रात्री चर्चा झाली. त्या चर्चेत एमआयएमने राष्ट्रवादी काँग्रेसकडे काही मागण्या समोर ठेवल्या. आपल्या मतदारसंघातील विकासाच्या संदर्भात या मागण्या होत्या. या मागण्या पूर्ण होत असल्यास आम्ही मविआला मतदान करु. त्यानंतर आज सकाळी इम्तियाज जलील यांनी ट्विट केलं आहे. वाचा : राज्यसभेसाठी समाजवादी पार्टीचं दोन मते मिळवण्यात ‘मविआ’ला यश आपल्या ट्विटमध्ये इम्तियाज जलील यांनी म्हटलं, “भाजपचा पराभव करायचा आहे. त्यासाठी आम्ही महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत असलेले राजकीय, वैचारिक मतभेद कायम राहतील.”
We laid certain conditions related to development of our MLAs constituencies in Dhulia and Malegaon. Also demanded Govt to appoint a minority member in MPSC and to take steps to increase the income of Maharashtra Wakf Board. Also demanded reservations for Muslims.
— Imtiaz Jaleel (@imtiaz_jaleel) June 9, 2022
धुळे आणि मालेगावमधील आमच्या आमदारांच्या मतदारसंघांतील विकासासाठी आम्ही काही अटकी घातल्या आहेत. तसेच एमपीएससीमध्ये अल्पसंख्यांक सदस्याची नियुक्ती करावी आणि महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे उत्पन्न वाढवण्यासाठी पावले उचलावे अशी मागणी केली. तसेच मुस्लिमांना आरक्षण देण्याचीही मागणी केली असल्याचं इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे एमआयएमची ही दोन मते काँग्रेसचे इमरान प्रतापगढी यांना मिळणार हे स्पष्ट झालं आहे. जर एमआयएमची दोन मते काँग्रेसला मिळणार असतील तर काँग्रेसची दोन मते ही शिवसेना उमेदवाराला दिली जातील अशा प्रकारची रणनिती आखली जाईल असं दिसत आहे. मनसेच्या एकमेव आमदाराचं मत कुणाच्या पारड्यात? शिवसेनेला आपला दुसरा उमेदवार संजय पवार तर भाजपला आपला तिसरा उमेदवार धनंजय महाडिक यांना विजयी करायचा असेल तर लहान पक्ष, अपक्ष आमदारांच्या मतांची आवश्यकता आहे. त्यासाठी शिवसेना आणि भाजप नेत्यांकडून लक्षान पक्षांचे आमदार आणि अपक्ष आमदारांच्या भेटीगाठी घेण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भाजपचे नेते आशिष शेलार हे 8 जून रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचले. ही भेट घेतल्यानंतर आशिष शेलार यांनी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधताना म्हटलं, पक्षाच्या वतीने येत्या राज्यसभा निवडणुकीत मनसेचं जे एक मत आहे ते भाजप उमेदवाराला मिळावं अशी विनंती मी राज ठाकरेंना केली. मी धन्यवाद व्यक्त करतो की, राज ठाकरेंनी आमच्या विनंतीला मान दिला आणि मला सांगितलं. ते मत भाजपला मिळेल. त्यामुळे आमचा विजय अधिक सुकर आणि सोपा होईल.