राष्ट्रवादीवर दुखाचा डोंगर, सुप्रिया सुळे मध्यरात्री पोहोचल्या राजेश टोपेंच्या भेटीला

राष्ट्रवादीवर दुखाचा डोंगर, सुप्रिया सुळे मध्यरात्री पोहोचल्या राजेश टोपेंच्या भेटीला

कोरोनामुळे जिल्ह्यांचे आढावा दौरे, सततच्या बैठका यात वेळात वेळ काढून आरोग्यमंत्री टोपे आईला भेटायला हॉस्पिटलमध्ये जायचे.

  • Share this:

मुंबई, 02 ऑगस्ट :  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई अंकुशराव टोपे यांचं वयाच्या 74 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झालं. कोरोनाशी मैदानात लढा देणारे राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई यांच्या निधनामुळे टोपे कुटुंबीयांसह राष्ट्रवादीवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मध्यरात्री हॉस्पिटलमध्ये जाऊन टोपे यांचं सांत्वन केलं.

शारदाताईंवर गेल्या महिनाभरापासून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मार्चमध्ये देखील त्या महिनाभर दाखल होत्या. बरे झाल्यानंतर त्या दोन महिने घरीच होत्या. मात्र, पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दाखल करण्यात आले होते. शनिवारी रात्री नऊच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. याची माहिती मिळताच मुंबईत रात्री हॉस्पिटलमध्ये जाऊन खासदार सुप्रिया सुळे आणि संदानंद सुळे यांनी राजेश टोपे यांच्या मातोश्री यांच्या पार्थिंव दर्शन घेतले. पहाटे 3 ते 4 च्या सुमारास शारदाताईंचं पार्थिव मुंबईतून जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यात अंतिम संस्कारासाठी नेण्यात आले.

शारदाताई या कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखान्याच्या अध्यक्ष होत्या, त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई, सुन, नातवंडे असा परिवार आहे.  त्यांच्यावर आज रविवार दि. 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता पार्थपूर ता. अंबड जि. जालना या मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कोरोनामुळे राज्यात अंत्यसंस्कारासाठी जी नियमावली केली आहे (मर्यादीत उपस्थितीची) त्याचे पालन करून अंत्यसंस्कार केले जातील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

कोरोनामुळे जिल्ह्यांचे आढावा दौरे, सततच्या बैठका यात वेळात वेळ काढून आरोग्यमंत्री टोपे आईला भेटायला हॉस्पिटलमध्ये जायचे. रोज सकाळी आईला भेटून दिवसाची सुरूवात ते करायचे.  ती अजातशत्रु होती. एका शब्दानेही तिने कुणाला दुखावलं नाही. सर्वांना प्रेम दिले. माझ्या वडिलांच्या सोबत ती सावली सारखी राहिली. 4 वर्षांपूर्वी वडील गेल्यानंतर ती आधार होती. दोन दिवसांपूर्वी तिने माझ्या पाठीवर दोन्ही हात ठेवत मला आशिर्वाद दिले. तो आशिर्वाद आता कायम माझ्या पाठीशी राहील, अशी भावना मंत्री टोपे यांनी व्यक्त केली.

राज्यात गेल्या चार महिन्यांपासून कोरोनाची परिस्थिती समर्थपणे हाताळणाऱ्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचेवर आईच्या मृत्यूमुळे दुखाचा डोंगर कोसळला.  टोपे यांच्या मातोश्रीच्या निधनाचे वृत्त कळताच अनेकांनी त्यांचे सांत्वन केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

'राज्याचे आरोग्यमंत्री तथा राज्य मंत्रिमंडळातील माझे सहकारी सन्माननीय राजेश टोपे यांच्या मातोश्री श्रीमती शारदाताई अंकुशराव टोपे यांचे निधन हा आमच्या सर्वांसाठी मोठा धक्का आहे. मी आदरणीय शारदाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. शारदाताईंनी ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार स्वर्गीय अंकुशराव टोपे  यांच्या जीवनाच्या प्रत्येक पावलावर समर्थ साथ दिली. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासारखा कर्तव्यदक्ष सुपुत्र महाराष्ट्राला दिला. मी स्वर्गीय शारदाताईंच्या स्मृतींना वंदन करतो. कोरोनाच्या संकटकाळात संपूर्ण राज्याच्या आरोग्याची काळजी घेत असताना राजेश टोपे यांनी त्यांच्या मातोश्रींच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. त्यांनी मातोश्रींचीही तितक्याच तन्मयतेने काळजी घेतली. आज मी, राज्य मंत्रिमंडळातील सर्व सहकारी आणि राज्यातील समस्त जनता राजेश टोपे कुटुंबियांच्या दुःखात त्यांच्यासोबत आहोत. स्वर्गीय शारदाताई यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच प्रार्थना', अशा शब्दात अजित पवारांनी आपली भावना व्यक्त केली.

Published by: sachin Salve
First published: August 2, 2020, 8:46 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading