मुंबई, 10 जुलै : एकीकडे आदित्य ठाकरे पक्ष वाचवण्यासाठी निष्ठा यात्रेदरम्यान महाराष्ट्रभर दौरा करीत आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरेही (Amit Thackeray) पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी नागरिकांच्या भेटी-गाठी घेत आहेत. अमित ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. येथे फिरताना ते तेथील समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. अमित ठाकरे कोकणातील समस्या जाणून घेण्यासाठी तळ कोकणातील माणसासोबत फिरत आहेत. याचा स्थानिकांनाही आनंद आहे. यासंदर्भात कोंकणी रानमाणून या इन्स्टाग्रामवरुन पोस्ट करण्यात आली आहे. यात अमित ठाकरेचे अनेक फोटो आणि व्हिडीओही आहेत.
अमितजी ठाकरे हा पहिलाच राजकीय नेता जो केवळ कोकण फिरायला नाही तर माझ्या सारख्या रान माणसाचे ग्राउंड वरील प्रॉब्लेम्स आणि वस्तुस्थिती ऐकायलाही आला होता…आम्ही सह्याद्रीतील नद्यांच्या जन्माचे गाव असलेल्या चौकुळ कुंभवडे गावाची सफर केली, असंही यात नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी अमित ठाकरेंनी एक फोटो शेअर केला होता. यात ते महाडच्या चवदार तळ्यावर दिसत आहे. बाबासाहेब आंबेडकरांसमोर उभं राहून काढलेला फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यात त्यांनी लिहिलं आहे की…. महाडच्या ऐतिहासिक चवदार तळ्याचं आज प्रथमच दर्शन घेतलं. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विनम्र अभिवादन केलं. पुतळ्याच्या खाली बाबासाहेबांचं एक वाक्य कोरलेलं होतं- “हा संगर केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कांसाठी आहे!” खरंच, सामाजिक विषमतेविरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडमधल्या या तळ्यावर केलेल्या एका क्रांतिकारी कृतीमुळे जगणं बदललं. आपल्या सर्वांचं!