• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • Mumbai: अचानक आलेल्या पावसाने त्रेधातिरपीट; आणखी किती दिवस आणि कुठे असेल मुक्काम?

Mumbai: अचानक आलेल्या पावसाने त्रेधातिरपीट; आणखी किती दिवस आणि कुठे असेल मुक्काम?

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आता मुंबईत काही ठिकाणी पाऊस पडतोय. पण या पावसामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

 • Share this:
  मुंबई, 18 नोव्हेंबर : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आता मुंबईत काही ठिकाणी पाऊस पडतोय. पण या पावसामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. संध्याकाळची वेळ असल्याने अनेकजण कार्यालयीन कामकाज निस्तारुन घराच्या दिशेला जायला निघाले आहेत. काहीजण संध्याकाळी फिरायला किंवा फेरफटका मारायला निघतात. तर विद्यार्थी-मुलं क्रिकेटच्या मैदानावर खेळण्यासाठी निघतात. या सगळ्यांनाच अनपेक्षितपणे पडलेल्या पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यांमधील काही भागांमध्ये काल (17 नोव्हेंबर) सकाळपासून ढगाळ वातावारण आहे. विशेष म्हणजे काल बऱ्यापैकी ऊन होतं. पण आज दुपारनंतर पूर्णपणे ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी दुपारी दोन ते तीन वाजेच्या सुमारास हलकासा पाऊसही पडला. त्यामुळे वातावरणात थोडासा गारवा पसरलाय. पण तिथे पुन्हा ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे त्या भागांमध्ये पुन्हा पावसाचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याने उकाडा वाढला आहे. या उकाड्यामुळे देखील नागरिक हैराण झाले आहेत. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबईसह राज्यातील काही भागांमध्ये पाऊस पडतोय. विशेष म्हणजे या क्षेत्राची तीव्रता आता वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टी परिसरात हवामान विभागाकडून हाय-अलर्ट जारी करण्यात आलं आहे. हवामान विभागाचे तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्विटरवर नुकतंच दिलेल्या माहितीनुसार कोकण किनारपट्टी आणि रायगडमध्ये ढगाळ हवामान कायम असेल. तसेच काही ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

  रायगडात 10 किमी पेक्षा जास्त अंतराचे काळे ढग, मुसळधार पावसाचा इशारा

  के. एस. होसाळीकर यांनी ट्विटरवर रायगडमधील परिस्थितीची माहिती दिली आहे. रायगडमध्ये एका ठिकाणी तब्बल 10 किमी अंतरापेक्षाही जास्त अंतरावर काळे ढग दिसत आहे. त्यामुळे संबंधित परिसरात वीजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. याशिवाय त्यांनी पुढच्या दोन तासांमध्ये ठाण्यातील काही भागांमध्येही पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे.

  मध्य महाराष्ट्रातही पावसाचा इशारा

  हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज कोकणात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच महाराष्ट्रातील इतर भागांमध्येही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

  राज्यात किती दिवस पाऊस पडणार?

  हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढचे तीन ते चार दिवस राज्यात पाऊस राहण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे पालघर, रायगड जिल्ह्यातील काही भागांमध्ये पावसाला सुरुवातही झाली आहे. येत्या चार दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
  Published by:Chetan Patil
  First published: